नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदनाच्या कामकाजात जाणीवपूर्वक आणण्यात येत असलेला व्यत्यय, बैठकांची घटती संख्या आणि विधानमंडळांच्या प्रतिष्ठेचा आणि शिष्टाचाराचा ऱ्हास होत असल्याबद्दल व्यथित होत चिंताही व्यक्त केली आहे.
विधीमंडळे ही वादविवाद आणि चर्चेची व्यासपीठे आहेत आणि कायदेकर्त्यांनी लोकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करणे अपेक्षित आहे, असे सांगून लोकसभा अध्यक्षांनी इशारा दिला की, बैठकांची संख्या कमी होत असल्याने विधीमंडळे त्यांचे संवैधानिक कार्य पूर्ण करण्यात कमी पडत आहेत. राष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी आणि जनतेच्या आवाजाचे पुरेसे प्रतिनिधित्व व्हावे यासाठी संसदीय वेळेचा प्रभावी वापर करण्याला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्या सदनांची प्रतिष्ठा राखणे आणि वाढवणे हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी सांगितले.
सर्व राजकीय पक्षांनी सभागृहात त्यांच्या सदस्यांच्या वर्तनासाठी अंतर्गत आचारसंहिता तयार करावी जेणेकरून लोकशाही मूल्यांचा आदर केला जाईल, असे बिर्ला यांनी सुचवले. लोकप्रतिनिधींनी राजकीय विचारसरणी आणि संलग्नतेच्या पलीकडे जाऊन संवैधानिक शिष्टाचाराचे पालन केले पाहिजे असे निरीक्षण नोंदवून, लोकप्रतिनिधींनी त्यांचे विचार आणि दृष्टिकोन व्यक्त करताना संसदीय परंपरांचा आदर केला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. आज पाटणा येथील बिहार विधिमंडळ परिसरात 85 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या (AIPOC) उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
लोकशाही संस्थांना बळकटी देताना, पीठासीन अधिकाऱ्यांनी विधीमंडळांना जनतेप्रती अधिक जबाबदार बनवले पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून लोकांच्या अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, संसदीय आणि कायदेविषयक कामकाजात पारदर्शकता आणि परिणामकारकता वाढवू शकते असे निरीक्षण नोंदवून बिर्ला म्हणाले की,भारतीय संसदेने ही प्रक्रिया आधीच सुरू केली आहे ज्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. देशातील अनेक विधानसभा कागदविरहित झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
चर्चा आणि मतभेदांमध्ये देखील सभागृहांनी अनुकूल वातावरणात काम केले पाहिजे जेणेकरून सदनात अधिक कामकाज होऊ शकेल,यावर बिर्ला यांनी भर दिला. भारताला अधिक बळकट करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचे आवाहन करताना, बिर्ला यांनी राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर, केंद्र आणि राज्य दोघांनीही ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या भावनेने एकत्र काम केले पाहिजे असे सांगितले.