अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील लोहगाव येथील गोपालक रोहीदास ढेरे यांच्या निवासस्थानी दिवाळीच्या पुर्वसंध्येला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट दिली. काही दिवसांपुर्वीच ढेरे यांच्या मुक्त गोठ्यातील २७ गायी दगावल्या होत्या. शासन स्तरावरून मदत मिळवून देण्याची ग्वाही देत महसूलमंत्र्यांनी या कुटुंबाला दिलासा दिला.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नैसर्गिक आपत्तीच्या कारणाने यंदाची दिवाळी आपण साजरी न करता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या बांधावर जावून दिलासा देणार असल्याचे जाहीर केले.दिवसभर त्यांनी अधिकाऱ्यां समवेत अतिवृष्टीमुळे नूकसान झालेल्या शेती क्षेत्राची पाहाणी करून महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले.
रात्री उशिरा त्यांनी लोहगाव येथील गोपालक रोहीदास ढेरे यांच्या निवासस्थानी येवून भेट दिली.काही दिवसांपुर्वी २७ गायी दगावल्याने संकटात सापडलेल्या या गोपालकाच्या कुटुंबाला दिवाळीच्या निमित्ताने दिलासा देण्याची भूमिका पशुसंवर्धन मंत्र्यांची होती.ढेरे परीवाराशी त्यांनी संवाद साधला.
महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी गोठ्याजवळ असलेल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करून गोठ्याची अतिशय संवेदनशील मनाने पाहाणी केली. पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ तुंभारे यांच्याकडून दगावलेल्या गायी बाबत माहीती घेवून मदत करण्यादृष्टीने केलेल्या कार्यवाहीची माहीती घेतली.
ढेरे परीवार ओढवलेले सकंट अतिशय दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,पोटच्या मुलाप्रमाणे आपण गोमातेचे जतन करतो.एकाचवेळी एवढे गोधन दगावणे हे खूपच मोठे दुख आहे.परंतू या संकटात शासन म्हणून शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करणार असून तशा सूचनाही आपण अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Lohgaon Farmer 27 Cow Death Revenue Minister