नवी दिल्ली – देशात कोरोनाचा घटत असलेला संसर्ग आणि बरे होणा-या रुग्णांची वाढती संख्या पाहता जूनच्या पहिल्या आठवड्यापासून लॉकडाउनमधून दिलासा मिळण्याची शक्यता वाढली आहे. दक्ष राहूनच लॉकडाउन शिथिल करण्याची गरज असून, ठरलेल्या निकषांमध्ये पॉझिटिव्हीटी दर आलेला असला तरी रुग्णसंख्या पुन्हा वाढू नये याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिका-यांचे म्हणणे आहे.
संसर्ग दर १० टक्क्यांहून खाली आला असून, तो आणखी खाली येण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. तेथे व्यवहार सुरळीत करता येऊ शकतात. दर कमी होत असलेल्या जिल्ह्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळेच कोरोनाच्या दुस-या लाटेतून देश बाहेर पडत असल्याचे संकेत मिळत आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड, बिहारसारख्या राज्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर पाच टक्क्यांहून कमी किंवा त्याच्या आसपास आला आहे. या राज्यात पॉझिटिव्हीटीचा दर आणि नवीन रुग्णसंख्या मार्चच्या शेवटच्या आठवड्याच्या स्तरावर पोहोचली आहे. तेव्ही तिथे लॉकडाउन नव्हते. बहुतांश राज्यांनी लॉकडाउनचा निर्णय १५ एप्रिलच्या आसपास घेतला होता. तेव्हा पॉझिटिव्हीटी दर ३६-३७ टक्के पोहोचला होता.
जूनच्या पहिल्या आठवड्यात अनेक राज्यांमध्ये लॉकडाउनमधून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पॉझिटिव्हीटी दर कमी झाल्यानंतरही लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय दोन कारणांमुळे घेण्यात आला. एक म्हणजे लॉकडाउन उघडल्यानंतर पॉझिटिव्हीटी दर वाढणे निश्चित मानले जात आहे. दुसरे कारण म्हणजे सक्रिय रुग्णांची संख्या अद्यापही कायम आहे. पॉझिटिव्हीटी दर कमी झाला तरीही सक्रिय रुग्णसंख्या खूपच जास्त आहे, अशा राज्यांनी जास्त सतर्क राहण्याची गरज आहे. आपली आरोग्य यंत्रणा, पॉझिटिव्हीटी दर आणि सक्रिय रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्यांनी लॉकडाउन हटविण्याचे निर्णय घ्यावेत, असे आरोग्य मंत्रालयाच्या अधिका-यांचे म्हणणे आहे.