नवी दिल्ली – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारला लॉकडाउन लावणे किंवा कोरोना संचारबंदी लागू करणे हाच जालीम उपाय वाटत आहे. त्यामुळेच लॉकडाउन लांबविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये कोरोना संचारबंदी तर तामिळनाडू आणि मिझोरममध्ये ३१ मेपर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आला आहे. मध्य प्रदेश सरकार इंदूरमधील लॉकडाउन उघडण्याची तयारी करत आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहेत. त्यांनी आधी रविवारची बंदी, नंतर शनिवारी-रविवार, त्यानंतर शनिवार, रविवार आणि सोमवारची बंदी लागू केली. बंदीचे सकारात्मक परिणाम पहायला मिळाले. त्यामुळे पूर्ण लॉकडाउन लावण्याऐवजी अंशतः कोरोना संचारबंदीचा निर्णय घेतला. १७ मेपर्यंतची संचारबंदी वाढवून २५ मेपर्यंत केली. कानपूर विभागाचा दौरा करून परतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी टीम-९ सोबत सरकारी बंगल्यावर बैठक घेतली. परिस्थितीचा आढावा घेताना ते म्हणाले, की अंशतः संचारबंदीचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. कोरोनाचा संसर्ग दर सलग घटत आहे. कोरोना रुग्ण बरे होत आहेत.
उत्तर प्रदेश सरकार आता कोरोनाच्या तिसर्या लाटेची तयारी करत आहे. काळी बुरशी आजाराचे आव्हानही समोर उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर अंशतः कोरोना संचारबंदी ३१ मेच्या सकाळी सात वाजेपर्यंत वाढविण्याचे निर्देश योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. यादरम्यान अत्यावश्यक वस्तू, वैद्यकीय सुविधा, औद्योगिक व्यवहार सुरू राहणार आहेत.
मध्य प्रदेशमध्ये ३१ मेपर्यंत संचारबंदी
मध्य प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ३१ मेपर्यंत कोरोना संचारबंदी वाढविण्यात आली आहे. भोपाळच्या जिल्हाधिका-यांनी शनिवारी आदेश जारी करत भोपाळ महापालिका आणि बैरसिया नगरपालिका क्षेत्रामध्ये २४ मे सकाळी सहा वाजेपर्यंत लावलेली संचारबंदी एक जून सकाळी सहा वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. इंदूरमध्ये ३१ मेपर्यंत संचारबंदी लागू राहील. इंदूरमध्ये २८ मेपर्यंत कडक लॉकडाउन लागू आहे. किराणा, फळे, भाजीबाजारसुद्धा बंद करण्यात आले आहेत. पेट्रोल पंप, औषधे, दूध पुरवठा सुरू आहे. एक जूनपासून इंदूरमध्ये लॉकडाउन उघडण्याची तयारी सुरू आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये संचारबंदीत वाढ
जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने कोरोना संचारबंदी ३१ मे सकाळी सात वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये कोरोना संचारबंदीला एका आठवड्यासाठी सर्व २० जिल्ह्यांमध्ये ३१ मे सकाळी सात वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. संचारबंदी काळात अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू राहील.