विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
लहानपणी आरोग्य चांगले व सुदृढ असेल तर मनुष्य पुढे आयुष्यभर सुदृढ राहतो, असे म्हटले जाते. परंतु सध्या लहान मुलांच्या शरीराची प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी लॉकडाऊन हा एक मोठा अडथळा ठरत आहे, असा दावा अमेरिकेतील प्रतिष्ठित मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी ) मधील वैद्यकीय शास्त्रज्ञांनी संशोधनाद्वारे केला आहे.
एमआयटीचे वैद्यकीय शास्त्रज्ञ म्हणतात की, लॉकडाउन काळामध्ये वर्षभर जगणारी मुले ही बाहेरील वातावरणातील विविध प्रकारचे जीवाणू आणि विषाणूंच्या संपर्कापासून दूर असतात. त्यामुळे त्यांची प्रतिकार शक्ती कमी होते. बाह्य विषाणूसारख्या हल्लेखोरांशी लढण्याची तयारी त्यांच्या शरीराची नसते. त्याकरिता बालपणातच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे आवश्यक आहे.
सदर शास्त्रज्ञ पुढे म्हणतात की, लहान मूल आपल्या तारुण्यापर्यंत पोहचते तेव्हा त्याच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती अनेक प्रकारचे बॅक्टेरिया-विषाणू आणि आजारांचा सामना करण्यास सक्षम होते. रोगप्रतिकारक शक्ती ही क्षमता लक्षात ठेवते आणि भविष्यातील आयुष्यात जेव्हा जेव्हा शरीरावर एखाद्या जंतूंचा हल्ला होतो, तेव्हा शरीर ही क्षमता वापरते, मात्र सध्या सर्वांना लॉकडाऊनमुळे घरातच राहण्याची वेळ आल्याने अशा बाहेरच्या वातावरणातील अन्य जिवाणू, विषाणूंचा सामना करण्याची तयारी मुलांमध्ये भविष्यात राहणार नाही.
संशोधक डॉ. डेव्हिड स्ट्रॅचन म्हणतात की, घरात वावरताना संसर्ग रोखण्यासाठी मुले वारंवार हात धुतात, किंवा त्यांना अधिक स्वच्छ वातावरणात ठेवले जाते. या अवस्थेमुळे, बालपणातील मुलांची प्रतिकारशक्ती सूक्ष्मजंतूंपेक्षा कमी असते, ज्यामुळे त्यांच्या शरीरात अॅलर्जीची समस्या उद्भवते. अशी मुले मोठी झाल्यावर त्यांना अनेक अॅलर्जीचा त्रास होऊ शकतो. तसेच प्रा जोनाथन होरिहाने म्हणतात की, लॉकडाउन सारख्या परिस्थितीमुळे फारच कमी लोकांच्या संपर्कात आलेल्या मुलांना वयाच्या ३०व्या वर्षी दमा, त्वचारोग, सर्दीची अॅलर्जी सारखे आजार होऊ शकतात.
एमआयटीमधील शास्त्रज्ञांना असेही आढळले आहे की, जेव्हा आपण एकाकीपणा अनुभवतो तेव्हा शरीराचा प्रतिजैविक – प्रतिरोध कमकुवत होतो. तसेच दुसर्या वैज्ञानिक विश्लेषणामध्ये असे दिसून आले आहे की, जे लोक समाजात एकत्र राहतात, त्यांची अपेक्षेपेक्षा जास्त जगण्याची शक्यता ५० टक्के अधिक असते.