मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकप्रिय शो लॉक अपला विजेता मिळाला आहे. स्टॅण्डअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने विजेतेपद पटकावले आहे. कंगना राणौतच्या या रिअॅलिटी शो लॉक अपचा फिनाले शनिवारी (७ मे) रात्री पार पडला. मुनव्वर फारुकीला नक्की किती रुपयांचे बक्षिस मिळाले हे आपण आता जाणून घेणार आहोत.
जेव्हा हा शो सुरू होणार होता, तेव्हा लॉक अपच्या पहिल्या सीझनबद्दल बरेच प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. हा शो यशस्वी होईल की नाही, अशी शंका उपस्थित करण्यात येत होती. परंतु हा शो हिट ठरला. एकता कपूरने बनवलेल्या या शोने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. कंगना राणौतने होस्ट केलेला, संपूर्ण ७० दिवसांचा शो ALTBalaji आणि MXPlayer वर प्रसारित करण्यात आला. या शोची अंतिम फेरी मनोरंजक व्हावी यासाठी सर्व तयारी करण्यात आली होती. शोचे माजी स्पर्धक आणि अंतिम स्पर्धकांनी यावेळी विशेष परफॉर्मन्स सादर केले.
सोशल मीडियावर लोकांनी फिनालेपूर्वीच स्टँडअप कॉमेडियन मुनव्वरला विजेता घोषित केले होते. खरोखरच तो विजेता झाल्याने शुभेच्छांचा वर्षाव त्याच्यावर करण्यात आला. लॉकअपमधील विजेत्यांना किती बक्षीस रक्कम दिली जाईल हे आधी जाहीर केले नव्हके. विजेतेपद जाहीर केल्यानंतरच त्याची माहिती मिळाली. त्यानुसार २० लाख रुपये कॅश, विदेश ट्रिप, ट्रॉफी, अशा अनेक भेटवस्तू फारुकीला मिळाल्या आहेत. फिनालेमध्ये, कंगना रणौतने तिच्या कौशल्यासह होस्टिंग केली. रॅपर बादशाह या शोमध्ये पाहुणा म्हणून आला होता. यादरम्यान कंगनाने तिच्या आगामी ‘धाकड’ या चित्रपटाचे प्रमोशन देखील येथे केले.
जेव्हा हा शो सुरू झाला तेव्हा त्यात २० स्पर्धक होते. तर केवळ सहा स्पर्धकांना अंतिम फेरीत स्थान मिळाले आहे. मुनव्वर फारुकी, अंजली अरोरा, पायल रोहतगी, प्रिन्स नरुला, शिवम शर्मा आणि आझम फलाह यांच्यात अंतिम फेरी रंगली. या ६ पैकी प्रिन्स नरुला, आझम फलाह हे वाईल्ड कार्ड स्पर्धक होते. शोमधील ग्रँड फिनाले वीकच्या खास परफॉर्मन्समध्ये तेजस्वी प्रकाश जेलर करण कुंद्रासोबत वॉर्डन बनून परफॉर्मन्स दिला.