विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
राजधानी दिल्लीत कोरोनाचे थैमान अद्यापही थांबत नसल्याने अखेर तिसऱ्यांदा लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा करण्यात आली आहे. आता दिल्लीत १७ मेच्या पहाटे ५ वाजेपर्यंत लॉकडाऊन राहिल, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.
केजरीवाल म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात आम्ही आरोग्य सुविधा वाढविण्यावर आणि सशक्त करण्यावर भर देत आहोत. लॉकडाऊन वाढविण्याबाबत आम्ही जनतेचा फीडबॅक घेतला. त्यानुसारच एक आठवड्याने वाढविला जात आहे. दिल्लीत मेट्रो सेवेला परवानगी राहणार नाही. लॉकडाऊनमुळे कोरोनाची साखळी तुटत आहे. २६ एप्रिलला कोरोनाचा संसर्ग दर ३५ टक्के होता तो आता २३ टक्के झाला आहे. तरीही अद्याप सर्व काही सुरळीत करण्यासारखी परिस्थिती नाही. जर तसे केले तर आता आपण जे काही मिळविले आहे ते सुद्धा आपल्याला गमवावे लागेल. जितका कडक लॉकडाऊन राहिल तितके आपण कोरोनावर विजय मिळवू. दिल्लीत ऑक्सिजनचा प्रश्न मोठा होता. मात्र सुप्रिम कोर्ट आणि हायकोर्टाच्या आदेशांनंतर आता स्थिती बरी आहे. दिल्लीत लसीची मोठी कमतरता आहे. आम्ही केंद्राकडे मागणी केली आहे. आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर लसीचा पुरवठा होईल, असे केजरीवाल यांनी सांगितले.