नाशिक – लॉकडाऊन झाल्यापासून शहरी भागातील रुग्णसंख्या कमी होत आहे. मात्र ग्रामीण भागात अद्यापही रुग्णवाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी रुग्णसंख्या कमी कशी होईल त्यादृष्टीने काटेकोर नियोजन करण्यात यावे, अशा सूचना राजियांचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
आज येवला विश्रामगृह येथे येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना व लसीकरण याबाबत आढावा बैठक पार पडली, त्यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी येवला नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, प्रांत अधिकारी सोपान कासार, डॉ. अर्चना पठारे, जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल आहेर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, तहसीलदार प्रमोद हिले, तहसीलदार शरद घोरपडे, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षक डॉ. शैलजा कृपास्वामी, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शरद कातकाडे उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ऑक्सिजनची कमतरता होऊ नये यासाठी ऑक्सिजनचा आवश्यक साठा रुग्णालयात ठेवण्यात यावा. डॉक्टर तसेच इतर कर्मचारी मनुष्यबळाची कमतरता असलेल्या केंद्रावर तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे. बंद असलेले व्हेंटीलेटर तातडीने सुरू करण्यात यावेत. ड्युरा आणि जम्बो सिलेंडरची आवश्यकता असल्यास आपली मागणी कळविण्यात येऊन उपलब्ध ते करून घेण्यात यावेत. शहरात प्रत्येक वार्डात नगरसेवकांनी तसेच स्वयंसेवी संस्थांनी पुढे येऊन तपासणी मोहीमेस सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करताना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, गृहविलीगिकरण यशस्वीरित्या पार पाडावे. त्याचबरोबर लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात यावी. रुग्णसंख्या कमी करण्यासाठी सर्वांनी आता आपापली जबाबदारी लक्षात अथक प्रयत्न करावेत.
तालुक्यातील खरीप हंगामात घेतली आढावा
खरीप पिकांच्या नियोजनाबाबत कृषी विभागाकडून केलेल्या नियोजनाचा आढावा घेऊन तालुक्यात खते, बियाणे यांचा साठा मुबलक प्रमाणात करण्यात यावा. तसेच खरीप हंगामाची तयारी पूर्ण करण्यात यावी, असेही निर्देश यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.