विशेष प्रतिनिधी, नाशिक/पुणे/औरंगाबाद
सध्या कोरोनामुळे अनेक दैनंदिन व्यवहार ठप्प असून देशभरात काही ठिकाणी अद्यापही लॉकडाऊन कायम आहे. आपल्या राज्यातही अद्याप अशीच परिस्थिती असल्यामुळे आबालवृद्ध घरातच बसून आहेत. घरात बसून नेमके काय करावे? असा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला असतो. त्यामुळे सहाजिकच मोबाईल किंवा टीव्ही पाहण्यात वेळ घालवण्यात येतो. मात्र याचा लहान मुलांवर अत्यंत दुष्परिणाम होत असल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे. भावी पिढीवर याचा विपरीत परिणाम होत असल्याने समाजशास्त्र, मानसशास्त्रज्ञ तसेच वैद्यकीय तज्ज्ञांनी देखील याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
सुमारे एक ते दिड वर्षापासून कोरोनामुळे सर्वच लहान मुले आपापल्या घरांमध्ये बसून असल्याचे दिसत आहेत. कारण कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय झाला, त्यानंतर ऑनलाईन लेक्चर्स सुरु झाले. घराबाहेर पडणे शक्य नसल्यामुळे मुलांचे मैदानात जाऊन खेळणेही आपोआप बंद झाले असून घरातच बसून मुलांना कंटाळा आला आहे. त्यामुळे बहुतांश मुले घरात मोबाईल किंवा टीव्हीचा मनोरंजनासाठी आणि अभ्यासाकरिता मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत.
सध्याच्या काळात या अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या साधनांचा वापर अपरिहार्य असला तरी त्यामुळे मुलांच्या शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत. सहाजिकच याचा मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. शरीराची हालचाल कमी होऊन अनेक मुलांच्या वजनात मोठी वाढ झाल्याच दिसून येत आहे. या काळात काही मुलांचे पाच किलो वजन वाढले तर काहींचे दहा किलोंनी वजन वाढले आहे. सहाजिकच पालकांसाठी ही बाब चिंतेची बाब ठरत आहे.
याबाबत पालकांनी सांगितले की, मुलांना खेळण्यासाठी बाहेर पाठवण्याची इच्छा असूनही कोरोनाच्या भीतीमुळे पाठवता येणे शक्य नाही, कारण खेळतांना मुले ऐकमेकांत अंतर राखून खेळू शकत नाहीत. तसेच खेळ खेळताना तोंडाला मास्क लावण्याचे देखील त्यांना भान नसते, त्याशिवाय हाताची स्वच्छता ठेवणे देखील कठीण असते, या उलट त्यांचा खेळताना तोंडाला हात लागतो.
विशेष म्हणजे अनेक पालक खूप दिवस टिव्ही आणि मोबाईल मुलांपासून दूर ठेवण्यासाठी आटापीटा करत होते, त्याच पालकांना टिव्हीवर आणि मोबाईलवर ऑनलाईन लेक्चर्स आणि शैक्षणिक कार्यक्रम पाहण्यासाठी नाईलाजाने किंवा सक्तीने मुलांच्या सांगणे भाग पडते. पण याचा फायदा होण्याऐवजी दुष्परिणाम होत आहे, अशी खंत काही पालकांनी व्यक्त केली.
बालरोग तज्ज्ञ डॉ. संदीप पाटील यांनी सांगितले की, सध्याच्या काळात मुलांची बदललेली जीवनशैली कारणीभूत ठरत आहे. अनेक मुलांचे मैदानी खेळ बंद झाले. त्यातच जिम बंद असल्याने मुलांनी व्यायामाकडे दुर्लक्ष केले आहे. लॉकडाऊनमुळे सायकलिंग आणि पोहाण्यासारख्या शारीरिक क्रिया बंद झाल्यने मुलांचे शरीर अधिक सुस्त बनत चालले आहे. त्याशिवाय नेहमी घरातच असल्यामुळे मुलांना फास्ट फूड आणि शीतपेयाची सवय लागली.
एकप्रकारे मुलांची दिनचर्याच बदलून गेल्याने त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम जाणवत आहेत. आता लहान मुलांच्या वजनामध्ये लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. परंतु मुलांच्या लठ्ठपणाकडे दुर्लक्ष करणे हे त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असे मतही देखील डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.