मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रक्तदाना प्रमाणेच अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. आजच्या अत्याधुनिक वैद्यकीय शास्त्रामुळे एखाद्या व्यक्तीला आपल्या नातेवाईकांना किडनी किंवा अन्य अवयव दान करता येऊ शकते. परंतु त्यासंदर्भात काही नियम आणि अटी आहेत. त्यानुसारच ही प्रक्रिया पार पडते. अन्यथा सरकार अशा अवयवदानाच्या प्रक्रियेला मंजुरी देत नाही असे दिसून येते.
महाराष्ट्र सरकारच्या एका समितीने 16 वर्षांच्या मुलीला तिच्या आजारी वडिलांना तिच्या यकृताचा एक भाग दान करण्यास परवानगी देण्यास नकार दिला आहे. कारण ती पूर्णतः सज्ञान नसल्याने या धोकादायक प्रक्रियेला ‘स्वतःची’ संमती दिली आहे की नाही याची समितीला खात्री वाटत नाही. या मुलीने तिच्या आईच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन राज्य सरकारला तिच्या यकृताचा काही भाग दान करण्याच्या परवानगीच्या अर्जावर प्रक्रिया करण्याचे निर्देश देण्याची विनंती केली होती.
अर्ज फेटाळताना, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या (डीएमईआर) संचालकांच्या अध्यक्षतेखालील राज्य प्राधिकरण समिती म्हणाली की, समिती भावनिक दबावाचा मुद्दा नाकारू शकत नाही आणि अल्पवयीन मुलीने तिच्यावर दबाव आला आहे की नाही याची खात्री करू शकत नाही. या याचिकेनुसार, मुलीचे वडील यकृताशी संबंधित गंभीर आजाराने त्रस्त आहेत. मुलीच्या अर्जावर निर्णय घेऊन त्याची माहिती देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात राज्य सरकारला दिले होते.
मुलीचे वकील तपन थत्ते यांनी न्यायमूर्ती ए. के. मेनन आणि एन. आर. बोरकर यांच्या सुटी खंडपीठासमोर अर्ज फेटाळणाऱ्या प्राधिकरण समितीचा अहवाल सादर केला. अहवालात असे म्हटले आहे की, मुलीच्या वडिलांना अंमली पदार्थांच्या व्यसनाचा दीर्घ इतिहास असून तेच यकृत खराब होण्याचे संभाव्य कारण आहे आणि तिच्या पुनर्वसनाचा कोणताही कागदोपत्री पुरावा नाही. परंतु मद्यपानामुळे रुग्णाचे यकृत निकामी झाल्याचा मुद्दा समोर आणला गेला नाही. या मुलीला आणि तिच्या आईला रक्तदात्याला रक्तदानासाठी करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेतील धोके आणि गुंतागुंत याविषयी माहिती नसल्याचे दिसते.
समितीने पुढे सांगितले की, मुलगी ही तिच्या पालकांची एकुलती एक मुलगी आहे. समितीच्या अहवालाला आव्हान देण्यासाठी उच्च न्यायालयाने मुलीला तिच्या याचिकेत सुधारणा करण्यास परवानगी दिली आणि सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब केली. याचिकेनुसार, याचिकाकर्त्याच्या वडिलांना मार्चमध्ये यकृत प्रत्यारोपण करण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र मुलगी वगळता अन्य जवळचा नातेवाईक वैद्यकीयदृष्ट्या दाता म्हणून योग्य असल्याचे आढळले नाही. तसेच मुलगी अल्पवयीन असल्याने अवयव प्रत्यारोपण कायद्यांतर्गत स्थापन केलेल्या समितीने मान्यता दिल्याशिवाय ती आपल्या वडिलांना यकृत दान करू शकत नाही, असे म्हटले आहे.