सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – किल्ले प्रतापगड आज शिवप्रतापदिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरुपात साजरा होत आहे. जिल्ह्याचे सुपुत्र व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते किल्ले प्रतापगडावर भव्य असा जरीकाठी भगवा झेंडा फडकविण्यात आला आहे. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले हे या सोहळ्याला अनुपस्थित आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला, स्वराज्य विस्ताराचा पाया ज्या गडाच्या पायथ्याशी घातला, इतिहासातील सर्वात मोठा प्रताप घडविला त्या किल्ले प्रतापगडावर अफजलखान वधाची तिथी दरवर्षी शिवप्रतापदिन म्हणून साजरी केली जाते. शिवप्रतापदिन उत्सवाच्या तयारीचा आढावा पालकमंत्री शंभुराजे देसाई यांनी वेळोवेळी घेतला होता. सध्या गडावर शिवप्रतापदिन सोहळा सुरू आहे. या सोहळ्याला पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील आदी उपस्थित आहेत.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1597847908627664898?s=20&t=BMd5w_Dua2xkPWEinIx7zw
ध्वजस्तंभास शोभेल असा भव्य जरीकाठी भगवा झेंडा उभारण्यात आला आहे. संपूर्ण गडाला दोन दिवस विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे. लेझर शो, मशाल महोत्सव व आतिषबाजी हे विशेष आकर्षण आहे. या सोहळ्याचे गावा-गावात ग्रामस्थांना निमंत्रण देण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांची कामेही करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या उत्सवात मर्दानी खेळ, लेझीम तसेच ढोलपथके, पोवाडा या पारंपरिक कार्यक्रमांसोबतच शासनातर्फे पोलीस मानवंदना देण्यात आली आहे. सुरवातीस सकाळी भवानी मातेची पूजा अभिषेक व आरती करण्यात आली. त्यानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम. शिवप्रतिमा पालखी पूजा, मिरवणूक, शिवपूतळ्यास जलाभिषेक, पूजा आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. यानंतर पोवाडा, मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, मर्दानी खेळ यांचे सादरीकरण असे कार्यक्रमाचे सर्वसाधारण स्वरुप आहे.
LIVE Pratapgad Shivpratap Din Celebration Various Program CM