पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प २ चे लोकार्पण आज झाले. यावेळी त्यांनी विविध विकास कामांचाही शुभारंभ केला. खासकरुन पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विकास कामांचा त्यात समावेश होता.
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प २ ला हिरवा झेंडा दाखवून, पंतप्रधान, श्री मोदी यांनी पुणे मेट्रो टप्पा १ च्या कार्य पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांच्या सेवेचे लोकार्पण केला. फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय स्थानक तसेच गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानकापर्यंत मेट्रो रूट असणार आहे. २०१६ मध्ये पंतप्रधानांच्याच हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. मेट्रो रेल्वेचे हे नवीन विभाग पुणे शहरातील शिवाजी नगर, दिवाणी न्यायालय, पुणे महानगरपालिका कार्यालय, पुणे आरटीओ आणि पुणे रेल्वे स्थानक यांसारखी महत्त्वाची ठिकाणांना जोडून, या प्रकल्पांचा लोकार्पण एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) अंतर्गत कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या (वेस्ट टू एनर्जी) संयंत्राचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले. सुमारे ३०० कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या या संयंत्राच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे २.५ लाख मेट्रिक टन कचरा वापरून वीज निर्मिती केली जाईल.
सर्वांसाठी घरे या उद्दिष्टपूर्तीच्या ध्येयाकडे वाटचाल करत, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात आलेली १२८० हून अधिक घरे पंतप्रधानांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आली. पुणे महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत बांधलेली २६५० हून अधिक घरे देखील पंतप्रधान हस्तांतरित करणार आहेत. यासोबतच, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात येणार्या सुमारे ११९० घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या ६४०० हून अधिक घरांची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
बघा, या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण