नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकमध्ये मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क साकारण्यात येणार असून त्याचा भूमीपूजन सोहळा सध्या सुरू आहे. केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा आडगाव येथील ट्रक टर्मिनसच्या ठिकाणी होत आहे. या पार्कसंदर्भात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या ऑक्टोबर महिन्यात नाशिक महापालिकेला ऑफर दिली होती. या पार्कसाठी लागणारी जागा आणि अन्य बाबींसाठी महापालिकेने पुढाकार घेतला तर मी स्वतः या प्रकल्पासाठी सर्वतोपरी मदत करेन, अशी ग्वाही गडकरी यांनी नाशिक दौऱ्यात दिली होती. त्यानुसर आता नाशिकला मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क साकारण्यात येणार आहे. नाशिकसह मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि दिघी बंदर येथे हे पार्क विकसीत केले जाणार असून त्यासाठीचे सामंजस्य करार होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे.
काय आहे मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क
नाशिकमध्ये अंबड, सातपूर, सिन्नरमध्ये माळेगाव आणि मुसळगाव, दिंडोरीत तळेगाव औद्योगिक वसाहत आहे. या औद्योगिक वसाहतींसाठी लिजिस्टिक पार्कची गरज असते. विविध कंपन्यांमध्ये तयार होणारी उत्पादने या पार्कमध्ये ठेवली जातात. एकप्रकारचे हे मोठे गोदाम आहे. मात्र, येथे केवळ वस्तू किंवा उत्पादने ठेवण्याची सुविधा नसते तर अन्य बहुविध सुविधा असतात. त्यात कार्गो, उत्पादनांचे ग्रेडिंग, वितरण, साठवणूक, फ्रेट स्टेशन आदी सुविधांचा समावेश असतो. या पार्कला उद्योगांच्या दराने वीज पुरवठा होतो. हा पार्क झाल्यास गुंतवणुकीला व उद्योग विकासाला चालना मिळते. नाशिक शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने शहराच्या बाह्य भागात (जेथे शहर सुरू होते) तेथे लॉजिस्टिक पार्क साकारला जाईल. यामुळे सर्व अवजड वाहने या पार्कमध्ये येतील आणि तेथूनच अन्य शहरात जातील. म्हणजे ही अवजड वाहने शहरात येणार नाहीत. यामुळे वेळ, पैसा आणि इंधनाची मोठी बचत होईल.
https://www.facebook.com/mayornashiksatishnanakulkarni/videos/497926435224854/