मुकुंद बाविस्कर, महाड
सलग सात दिवस तुफान पावसाने महाड शहरासह परिसराला झोडपले आहे. कधी तुफान तर कधी मुसळधार पावसाने रौद्र रुप दाखविले. पाऊस थांबण्याचे नावच घेत नव्हते. आता थोडी उघडीप मिळाली आहे. अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना महापूर आला आहे. (आता थोडे पाणी उतरत आहे.) सहाजिकच महाडवासिय सुखरूप आहेत की नाही? याची सर्वांना चिंता लागली आहे. त्यामुळेच वारंवार फोन कॉल, व्हॉट्सअॅप, व्हिडिओ कॉल द्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, येथील सर्व नागरिकांचे मोबाईल बेशुद्ध पडले आहेत. एकमेकांशी कुठलाही संपर्क साधता येत नाही.
परमेश्वराच्या कृपेने आणि अनेकांच्या सदिच्छेमुळे आम्ही महाडवासिय सुखरूप आहोत. गेल्या आठवडाभरापासून वीजपुरवठा खंडित होत असल्याने मोबाईल बंद आहेत. मोबाईल टॉवर देखील कोसळले आहेत. कदाचित आणखी आठवडाभर वीज पुरवठा सुरू होणार नाही, असे दिसते. कारण पूर्ण कोकणातच विद्युत यंत्रणा कोलमडून पडली आहे. त्यामुळे वीज पुरवठा लवकर सुरू होणार नाही. परिणामी, पाणीपुरवठा देखील बंदच आहे.
पिण्याच्या पाण्यापासून वापराच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. इमारतीत राहणाऱ्यांचीही मोठी परीक्षा आहे. तळमजल्यावरील टाकीतून किंवा अन्य ठिकाणाहून शेकडो पायऱ्या चढून दररोज पाणी आणावे लागत आहे. अनेकांनी एक दिवसाआड आंघोळीला सुट्टी दिली आहे. कपडे धुण्यासाठी ३ ते ४ दिवसाआड साधारणतः एक किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरावरील छोटे-छोटे धबधबे आणि ओहोळ येथे अनेकांना लागत आहे.
दूध पिवशी आणि दूध पावडर मिळण्याचेही वांधे झाले आहेत. साधी मेणबतीही मिळत नसल्याने नागरिकांची कठीण परीक्षा सुरू आहे. फ्रिजही बंद असल्याने खाद्य पदार्थही ठेवता येत नाही. भाजीपाला मिळणेही दुरापास्त आहे. नागरिकांचे इतके प्रचंड हाल आहेत की त्याची कल्पनाही करवत नाही. टीव्ही, मोबाईल सारे बंद असल्याने आम्ही जगापासून कोसो दूरच आहोत, असे वाटते.
येथील हालापेष्टा सहन करण्यापेक्षा आपापल्या गावी परतावे, अशा मानसिकतेत अनेक नागरिक आहेत. त्यासाठी अनेकांनी बसस्टँडच्या ठिकाणी धाव घेतली. तेथे अतिशय भयानक परिस्थिती आहे. संपूर्ण बसस्टँड चिखलाने भरलेले आहे. त्यामुळे बससेवा ठप्प झाली आहे. गावातील सर्व रस्ते चिखलाने भरलेले आहेत. अनेकांचे संसार वाहून गेले. बहुतांश जणांच्या घरांमध्ये चिखलाचेच साम्राज्य आहे.
मुंबई, ठाणे सह राज्याच्या विविध भागातील सामाजिक संस्था मदतीचा हात देत आहेत. शासकीय पातळीवर काम सुरू आहे. परंतु गरीबांना किती प्रमाणात आणि काय मिळेल? हे सांगता येत नाही. कारण अडचणी अनंत आहेत. येथील अडचणी आणि समस्येवर उपाय म्हणून अनेक जण गावाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. जवळपासचे काही जण त्यांच्या जवळच्या गावाला रवाना झाले आहेत. महाड परिसरातील अनेक घाटात व रस्त्यांवर दरड कोसळल्याचे सांगितले जात आहे. वाहतूक अत्यंत तूरळक आहे. काही वाहने मोठी कसरत करताना दिसत आहेत. खासगी कंपन्याही बंद अवस्थेत आहेत. जनरेटरही ठप्प आहेत. वीज पुरवठा बंद आहे. सर्वत्र काळोखाचेच वर्चस्व आहे. ही सर्व माहिती पाठविण्यासाठीही किती कष्ट पडले आहेत हे सांगूही शकत नाही.
आपल्या सर्वांच्या सदिच्छा पाठिशी असू द्या. धन्यवाद