नाशिक – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत सर्व यंत्रणांनी कडक निर्बंधांची अंमलबजावणी करावी व नागरिकांनी देखील सर्व निर्बंधांचे योग्य पालन करावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात नाशिक शहर व जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीचा आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टेकर, पोलीस उपायुक्त संजय बरकुंडे, अन्न औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त माधुरी पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, डॉ. निखिल सैदाणें आदी उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, 1 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या सूचनांची प्रशासकीय यंत्रणांनी अंमलबजावणी चांगल्या प्रकारे केली आहे. याचप्रमाणे कामाचा वेग कमी न करता कोरोना विषाणूची वाढती चेन ब्रेक करण्यासाठी यंत्रणांनी कसोशीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
गेल्या तीन ते चार दिवसात शहरातील 46 रुग्णालयांत नवीन बेड्सची व्यवस्था करण्यात आली असून महानगरपालिकेच्या रुग्णालयांत साधारण 2000 व जिल्ह्यात एकूण 4 हजार 500 बेड्स वाढविण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यात ऑक्सिजनचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध असून टेस्टिंग करिता महानगरपालिकेच्या मार्फत सुरू करण्यात आलेल्या लॅबच्या माध्यमातून दररोज साधारण 5 हजार तपासण्या होणार असल्याचेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.
संचारबंदी काळात पोलीस विभागाची जबाबदारी महत्वाची असल्याने 500 होमेगार्डस यांची सेवा अधिग्रहित करण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात बॅरिकेटिंग करणे, जमाव बंदीच्या आदेशांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी आवश्यक ती कारवाई पोलिसांमार्फत करण्यात यावी. तसेच मास्क न वापरणे, सुरक्षित अंतराचे नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी पोलीस यंत्रणेस यावेळी सांगितले.
शासनाने ब्रेक द चेन नुसार दिलेल्या निर्देशाप्रमाणे जीवनावश्यक बाबींची दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील असेही श्री भुजबळ यांनी सांगितले.
नाशिक शहर व जिल्ह्यातील वाढता संसर्ग विचारात घेतात जीवनावश्यक गोष्टींची दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेतच सुरू राहतील, असा निर्णय नाशिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतलेला आहे. यातून मेडिकल स्टोअर व दवाखाने वगळलेले असल्याचे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रतिबंधित क्षेत्राच्या बाबतीत मार्गदर्शन करतांना सांगितले की, नाशिक शहरातील रुग्णसंख्या कमी करण्यासाठी आवश्यक प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये सर्व नेमून दिलेल्या बाबींची कठोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे . तसेच प्रतिबंधित करण्यात आलेल्या गृहसोसायट्यांच्या चेअरमनने तेथील कोरोनाबधित रुग्णांची अद्ययावत माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक करण्यात यावे. त्याचप्रमाणे बाधित रुग्णांच्या ट्रेसिंगवर भर देण्यात येऊन, पहिल्या लाटेत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या महाकवच प्रणालीचा वापर बाधित रुग्णांना बंधनकारक करण्यात यावे. या सर्व उपाययोजना अंती काही दिवसात रुग्ण संख्या नक्कीच कमी होईल, असा विश्वास विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शासनाने जारी केलेल्या ब्रेक द चेनच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कामांचा आढावा पालकमंत्री यांना सादर करताना सांगितले की, जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड रुग्णांच्या अनुषंगाने पुनर नियोजन करून 100 बेड वाढवण्यात आले आहेत. तसेच 66 व्हेंटिलेटरचे आवश्यक तेथे वाटप करण्यात येऊन साधारण 9 ते 10 व्हेंटिलेटर्स अत्यावश्यक प्रसंगी वापरण्याकरिता राखीव ठेवण्यात आले आहेत. 27 ड्युरा ऑक्सिजन सिलेंडरची मागणी करण्यात आली असून गुरुवारपर्यंत ड्युरा सिलेंडर प्राप्त होणार आहेत. त्याचप्रमाणे मराठा विद्या प्रसारक व एस एम बीटी येथे देखील अधिकचे बेड अधिग्रहित करण्यासाठी आदेशित करण्यात आले आहे. सध्याच्या परिस्थितीत बेड्स ऑक्सिजन औषध पुरवठा यासारख्या आरोग्यसुविधा निर्माण करण्यासाठी काही मर्यादा येत असल्या तरी शर्तीचे प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत यासाठी शासनाने लागू केलेले कडक निर्बंधांचे पालन करून नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी श्री मांढरे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी महानगरपालिका, जिल्हा परिषद व पोलीस यंत्रणांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती पालकमंत्री यांना बैठकीत सादर केली.
बघा, त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा हा व्हिडिओ