नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांच्यासह खाण मंत्रालयाचे सचिव आणि खाण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज नवी दिल्लीत अर्जेंटिनाच्या कातामार्काचे राज्यपाल राउल अलेहांद्रो हलील यांच्यासमवेत बैठक पार पडली. यावेळी खाण क्षेत्रातील, विशेषत: लिथियमचा शोध आणि गुंतवणुकीच्या संधी यामधील सहकार्य वाढविण्यावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. खाण मंत्रालयाच्या अखत्यारीतील मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेड (MECL) हा सार्वजनिक उपक्रम आणि अर्जेंटिनाच्या कातामार्काचे प्रांतीय सरकार यांच्यात झालेला सामंजस्य करार हे या बैठकीचे ठळक वैशिष्ट्य ठरले. या करारामुळे अतिमहत्त्वाच्या खनिजांचा शोध आणि स्रोतांच्या विकासात खोलवर सहकार्याचा मार्ग मोकळा होईल.
मोठ्या प्रमाणात लिथियमचा साठा असल्याने ‘लिथियम ट्रँगल’चा एक भाग अशी ओळख असलेला अर्जेंटिना हा देश इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी आणि नवीकरणीय ऊर्जेसाठी साठवणुकीसाठी आवश्यक खनिजांची पूर्तता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने भारताचा महत्त्वाचा भागीदार आहे. यावेळी खानिज बिदेश इंडिया लिमिटेड (काबिल) आणि कातामार्कामधील ग्रीनको कडून लिथियमचा शोध घेण्यासाठी सध्या सुरू असलेले प्रयत्न तसेच अर्जेंटिनाच्या खाण प्रकल्पांमध्ये भारतीय कंपन्यांच्या सहभागात वाढीच्या शक्यता या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली. गुंतवणुकीच्या मार्गांचा शोध, दीर्घकालीन पुरवठा करार आणि या महत्त्वाच्या खनिजाचा भारताला होणारा पुरवठा मजबूत होण्यास मदत होईल, अशा संयुक्त उपक्रमांच्या शक्यतेचाही दोन्ही बाजूंकडून शोध घेण्यात आला.
या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून, भारत आणि अर्जेंटिनाने महत्त्वपूर्ण खनिज क्षेत्रामध्ये संबंध मजबूत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर शिक्कामोर्तब केले. या सहकार्यामुळे लिथियमचा शोध घेण्याच्या प्रकल्पांना गती मिळण्याची, स्रोतांच्या सुरक्षेत वाढ होण्याची आणि लॅटिन अमेरिकेतील खाण क्षेत्रात भारतीय कंपन्यांना नवीन संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.