नितीन नायगावकर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
अवघ्या देशासाठी आनंदाची बातमी आहे. अतिदुर्मिळ मानल्या जाणाऱ्या लिथियमचा मुबलक साठाच जम्मू –काश्मीर खोऱ्यात सापडला आहे. लिथियम साठ्याचा अशाप्रकारे प्रथमच शोध लागला आहे. हा साठा सुमारे ५.९ दशलक्ष टनांचा अर्थात ३,३८४ अब्ज रुपये किमतीचा असल्याचे मानले जात आहे. आपल्याला त्याचा नेमका लाभ काय? कशावर परिणाम होणार हेच आपण आता जाणून घेणार आहोत.
लिथियमचे अनेक फायदे आहेत. पण, त्याचा सर्वाधिक वापर रिचार्जेबल बॅटरी बनवण्यासाठी होतो. रिचार्जेबल बॅटरीत लिथियम हा महत्त्वाचा घटक असतो. स्मार्टफोन, लॅपटॉप सारखी अनेक उपकरणे तसेच विजेवरील मोटारींसाठी या ‘बॅटरी’ वापरल्या जातात. कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून २०३० पर्यंत खासगी ‘इलेक्ट्रिक मोटारीं’ची संख्या ३० टक्क्यांनी वाढवण्याच्या भारताच्या प्रयत्नांना लिथियम साठय़ाच्या शोधामुळे चालना मिळू शकते.
देशात खनिजसंपन्न नवे ५१ ब्लॉक्स
भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण विभागाला जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील सालाल-हैमाना भागात लिथियमचे साठे सापडल्याचे केंद्रीय खणीकर्म मंत्रालयाने जाहीर केले आहे. देशात असे नव्याने एकूण ५१ ब्लॉक सापडले आहे. यापैकी ५ ब्लॉकमध्ये लिथियम, गोल्ड, पोटॅश, मॉलिब्डेनमचे साठे आहेत. याशिवाय १७ ब्लॉक्समध्ये कोळशाचा साठा आहे.
https://twitter.com/dryadusingh/status/1624678857688387584?s=20&t=YGzMi-_Bv2z-AOLdRWy0WA
मुबलकता कमीच
जम्मू आणि काश्मीरमध्ये लिथियम असल्याचा जो अंदाज व्यक्त करण्यात आला तो तुलनेने जगातील इतर लिथियम साठ्यांहून कमी आहे. याआधी बोलिव्हियामध्ये सर्वाधिक २१ दशलक्ष, अर्जेंटिनामध्ये १७ दशलक्ष टन, ऑस्ट्रेलियामध्ये ६.३ दशलक्ष टन आणि चीनमध्ये ४.५ दशलक्ष टन लिथियम साठा असल्याचे समोर आले आहे, त्यातुलनेत आपल्याकडे अंदाजित केलेला साठा लहान आहे.
सध्या आयातीवरच अवलंबून
भारत सध्या लिथियम आयात करत आहे. याशिवाय राजस्थान आणि गुजरातच्या भूगर्भातील जलाशयामधून लिथियम शोधण्याचा प्रयत्न झाला आहे. असाच प्रयत्न ओडिशा आणि छत्तीसगढच्या अभ्रक पट्ट्यांमधून लिथियम काढण्यासाठी अन्वेषण करण्यात आलेले आहे. हे खनिज आणि त्याचा कच्चा माल मिळवण्यासाठी सध्या भारत जवळजवळ संपूर्णपणे चीनवर अवलंबून आहे.
Lithium Deposit India Benefits Industry Development