मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी LIC) ही विमा कंपनी २०२१मध्ये जागतिक ब्रँड क्रमवारीत २०६व्या स्थानावर पोहोचली आहे. ब्रँड फायनान्सनुसार २०२१ मध्ये ८.६५५ अरब डॉलर मुल्यांकनासह एलआयसी हा देशातील सर्वात मोठा आणि मजबूत ब्रँड आहे. म्हणजेच, भारतासह जागतिक पातळीवर एलआयसीने आपल्या कामकाजाचा ठसा उमटविल्याचे स्पष्ट होत आहे.
एलआयसी (लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड), निर्गुंतवणुकीसाठी तयार असलेली देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. ८.६५६ अरब डॉलर्स (सुमारे ६४ हजार ७७२ कोटी रुपये) मुल्यांकनासह देशातील सर्वात मजबूत आणि सर्वात मोठा ब्रँड आहे. या मूल्यांकनामुळे तो जगातील तिसरा सर्वात ‘मजबूत’ विमा ब्रँड बनतो. लंडन-आधारित ब्रँड फायनान्सच्या मते, एलआयसीचे बाजार मूल्य २०२२पर्यंत ४३.४० लाख कोटी रुपये किंवा ५९.२१ अरब डॉलर आहे आणि २०२७पर्यंत ते ५९.९ लाख कोटी रुपये (७८.६३ अरब डॉलर) होण्याचा अंदाज आहे.
जगातील १० सर्वात मौल्यवान विमा ब्रँड अहवालानुसार, एलआयसी ८४.१ गुणांसह आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा ब्रँड ताकदीच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. तर इटलीचे पोस्ट इटालियानो स्पेनच्या मॅपफ्रे आणि स्पेननंतर जागतिक स्तरावर ब्रँड सामर्थ्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. हे जगातील १० सर्वात मौल्यवान विमा ब्रँडपैकी एक आहे. हा अहवाल नोव्हेंबर २०२१मध्ये तयार करण्यात आला होता. तो आता सार्वजनिक करण्यात आला आहे.
एलआयसी २०२१मध्ये जागतिक ब्रँड क्रमवारीत ३२ स्थानांची झेप घेत २०६व्या स्थानावर पोहोचली आहे. ब्रँड फायनान्सच्या मते, २०२१ मध्ये ८.६५५ अरब डॉलर मुल्यांकनासह एलआयसी हा देशातील सर्वात मोठा आणि मजबूत ब्रँड आहे. २०२०मध्ये त्याचे मूल्य ८.११ अरब डॉलर होते. म्हणजेच ६.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ३१ मार्च २०२२पूर्वी एलआयसी आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफर) आणण्याची योजना आहे. एलआयसीमध्ये सरकारची १०० टक्के हिस्सेदारी आहे. अहवालानुसार, ३१ मार्च २०२१पर्यंत एकूण ४,५१,३०३.३० कोटी रुपयांच्या पोर्टफोलिओपैकी, नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्स (NPAs) रुपये ३५,१२९.८९ कोटी आहेत. उप-मानक मालमत्ता २५४.३७ कोटी रुपये आहे, तर इतर मालमत्ता २०,३६९.१७ कोटी रुपये आणि तोटा मालमत्ता १४,५०६.३५ कोटी रुपये आहे.