मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी)ची प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) लवकरच होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. देशातील गुंतवणूकदार त्याची वाट पाहात आहेत. ही प्रतीक्षा आता अंतिम टप्प्यात आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, एलआयसीचा आयपीओ गुंतवणूकीसाठी पुढील महिन्यात ११ मार्चला खुला होण्याची शक्यता आहे. परंतु सरकार किंवा विमा कंपनीकडून याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या आयपीओमध्ये ७५ लाख रुपयांपासून १ कोटी रुपयांपर्यंत किरकोळ गुंतवणूकदार सहभागी होण्याची शक्यता आहे, अशी एलआयसीला आशा आहे. भांडवली बाजारात गुंतवणूक करणाऱ्या एकूण भारतीय नागरिकांच्या किमान सात टक्के नागरिक यामध्ये गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. यामध्ये एलआयसीचे पॉलिसीधारक आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विमा कंपनीला या गुंतवणूकदारांकडून जवळपास २५ हजार कोटी रुपये उभारणी करण्याचा अंदाज आहे.
आयपीओच्या अंदाजानुसार यामध्ये ७.५ ते १० लाख किरकोळ गुंतवणूकदार सहभाग घेण्याची शक्यता असून, ही भारतीय भांडवली बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी गैरसंस्थात्मक भागीदारी असू शकते. एलआयसीच्या अंदाजानुसार, या समभागविक्रीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची सरासरी गुंतवणूक ३० ते ४० हजार रुपये असेल. ही माहिती इकॉनॉमिक टाइम्सच्या एका वृत्तात एलआयसी सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. बुक रनर्स आणि शेअर बाजारातील इतर सहभागी होणाऱ्या गुंतवणूकदारांकडून मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारावरून एलआयसीने हा अंदाज बांधला असल्याचेही इकॉनॉमिक टाइम्समधील वृत्तात म्हटले आहे. समभागविक्रीच्या माध्यमातून एलआयसी जवळपास ५ टक्के भागीदारी विक्री करणार आहे. आयपीओचे व्यवस्थापन कोटक महिंद्रा, सिटी बँक, अॅक्सिस बँक, नोमुरा, बोफा सिक्योरिटीज, गोल्डमॅन सॅक्स, आयसीआयसीआय सिक्योरिटीज, जेएम फायनान्शिअल आणि जेपी मॉर्गनतर्फे करण्यात येणार आहे. आयपीओला मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नियामकीय मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्राइज बँड आणि लॉट साइज निश्चित केला जाणार आहे.