मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीचा आयपीओ विक्री करण्यास खुला झाल्यानंतर एलआयसीच्या शेअरचा दर किती असेल याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले होते. आता ती प्रतीक्षा संपली आहे. एलआयसी ही मंगळवारी (१७ मे) शेअर बाजारात लिस्ट झाली आहे. एलआयसीचा दर आठ टक्क्यांच्या सवलतीच्या दरात लिस्ट झाला आहे. मुंबई शेअर बाजारात ८६७.२० रुपये आणि राष्ट्रीय शेअर बाजारात ८७२ रुपये प्रतिशेअर दराने लिस्ट झाला आहे. एलआयसीने प्रतिशेअर ९४९ रुपये दर निश्चित केला होता. एलआयसी शेअर बाजारात सवलतीच्या दरात लिस्टिंग झाल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये थोडी निराशा दिसून आली.
एलआयसीच्या लिस्टिंग कार्यक्रमात डीपमचे सचिव तुहीनकांता पांडे, एलआयचे अध्यक्ष एम. आर. कुमार, बीएसईचे अध्यक्ष आशिष चौहान आदी उपस्थित होते. एलआयसीमधील ३.५ टक्के भागीदारी विक्री करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. २ मे रोजी एलआयसीचा आयपीओ खुला झाला होता. गेल्या आठवड्यात आयपीओचे वाटप झाले होते.
भारतीय गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला, मात्र परदेशी गुंतवणूकदारांचा कमी प्रतिसाद लाभला. ग्रे मार्केटमध्ये एलआयसीचे प्रीमियम दर घसरू लागल्यामुळे एलआयसीची लिस्टिंग सवलतीच्या दरात होण्याची शक्यता ग्रे मार्केटमधून व्यक्त केली जात होती. एलआयसीचे सर्वाधिक सब्सक्रिप्शन पॉलिसीधारकांसाठी राखीव असलेल्या कोट्यात ६.१२ पटीने झाल्याचे पाहायला मिळाले.
एलआयसी शेअर बाजारात सवलतीच्या दरात लिस्ट झाल्यानंतर एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य ६ लाख कोटींहून अधिक राहण्याची शक्यता आहे. बाजार भांडवल दराच्या मूल्यानुसार सध्या एलआयसीपेक्षा रिलायन्स इंडस्ट्रिज, टीसीएस, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिस या कंपन्यांचे बाजार भांडवल अधिक आहे. त्यानंतर एलआयसीचा क्रमांक लागतो.