नाशिक : पत्नीशी प्रेमसंबध असल्याच्या संशयातून दोघांवर प्राणघातक हल्ला करून तरूणाचा निर्घुण खून करणा-या आरोपीस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश ए.एस.वाघवसे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना आॅगष्ट २०१८ मध्ये एकलहरा रोडवरील गंगावाडी भागात घडली होती.
दिपक भगवान पवार (३५ रा.भैरवनाथनगर,जुना सायखेडारोड,पंचक शिवार) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेत संदिप वसंत मरसाळे या युवकावर धारदार कु-हाडीने वार करण्यात आल्याने त्याचा मृत्यु झाला होता. दिपक पवार यास वसंत मरसाळे आणि त्याच्या पत्नीचे अनैतिक संबध असल्याचा संशय होता. यातून ही हत्या झाली होती. मरसाळे व अक्षय माधव बानाईत हे दोघे मित्र २२ आॅगष्ट २०१८ रोजी दुपारच्या सुमारास गंगावाडी शिवारातील एकलहरारोडवरील एका मोरीजवळ उभे असतांना आरोपीने त्यांना गाठून दोघा मित्रांवर कु-हाडीने हल्ला केला होता. या घटनेत दिपक पवार याचा मृत्यु झाला. तर अक्षय बानाईत जखमी झाला होता.
याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अक्षय बानाईत याने दिलेल्या तक्रारीवरून खूनासह प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक निरीक्षक के.एस.सोनोने यांनी करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. हा खटला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात चालला. सरकार तर्फे अॅड.एस.जी.कडवे यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अधिका-यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस सीआरपीसी कलम २३५ (२) अन्वये दोषी ठरवून आरोपी दिपक पवार यास भादवी कलम ३०२ मध्ये जन्मठेप व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. हा खटला शाबित होण्याच्या दृष्टीने पैरवी अधिकारी म्हणून हवालदार के.एस.दळवी आणि एस.यू गोसावी यांनी पाठपुरावा केला.