मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) चे शेअर दिवसेंदिवस घसरत असल्याने गुंतवणूकदार धास्तावले आहेत. त्याची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. त्यामुळेच सरकारकडून एक महत्त्वपूर्ण विधान आले आहे. ९२० रुपयांना लॉन्च झालेला शेअर सध्या थेट ७०९ रुपयांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन (DIPAM) विभागाचे सचिव तुहिन कांत पांडे म्हणाले की, एलआयसीच्या समभागातील घसरणीबद्दल सरकार चिंतेत आहे. यासोबतच ही घसरण तात्पुरती असल्याचेही त्यांनी सांगितले. तुहिन कांत पांडे यांच्या मते, एलआयसीचे व्यवस्थापन या सर्व पैलूंवर लक्ष देईल आणि भागधारकांसाठी मूल्य निर्माण करेल. भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) शेअर १७ मे रोजी ८७२ रुपये प्रति शेअरने लिस्ट झाला होता. सरकारने एलआयसीच्या शेअरची इश्यू किंमत 949 रुपये प्रति शेअर निश्चित केली होती.
शेअर इश्यू किमतीच्या खाली: एलआयसीचा स्टॉक लिस्ट झाल्यापासून इश्यू किमतीच्या खाली राहिला आहे. या कालावधीत तो प्रति शेअर 708.70 रुपये नीचांकी आणि 920 रुपये प्रति शेअर उच्च पातळीवर गेला आहे. शुक्रवारी बीएसईवर एलआयसीचा शेअर 709.70 रुपये प्रति शेअरवर बंद झाला. एलआयसीचे मार्केट कॅप लिस्ट झाल्यापासून 6 लाख कोटी रुपयांवरून 4.48 लाख कोटी रुपयांवर आले आहे. म्हणजेच एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत LIC च्या गुंतवणूकदारांना 1.52 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.