नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते परंतु ही रक्कम कमी असते, आणि त्यातच आजारपण आणि अन्य खर्च मात्र वाढत असतात. त्यामुळे आर्थिक गणित कोलमडू शकते. मात्र एलआयसीची एक चांगली योजना यासाठी उपलब्ध आहे.
या योजनेमध्ये तुम्हाला दरमहा 9250 रुपये पेन्शन मिळू शकते, ज्याद्वारे निवृत्तीनंतरचे जीवन सहजतेने जगू शकाल. या प्रधानमंत्री वय वंदना योजना नाव आहे, ज्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर निवृत्तीनंतर कोणतेही टेन्शन येणार नाही. या प्लॅनबद्दल जाणून घेऊ या …
प्रधानमंत्री वय वंदना योजना ही एक सरकारी पेन्शन योजना असून ती भारतीय आयुर्विमा महामंडळ चालवत आहे. ही योजना दि. 4 मे 2017 रोजी केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून सुरू केली. या योजनेत एकरकमी किंवा दर महिन्याला गुंतवणूक करण्यास सूट आहे.
केंद्र सरकारच्या या योजनेत दरवर्षी 7.40 टक्के व्याज दिले जाते. यामध्ये दरमहा एकरकमी जमा करून निश्चित पेन्शन मिळू शकते. या योजनेत एकरकमी गुंतवणुकीची मर्यादा 7.5 लाख रुपये होती. जी आता 15 लाख रुपये करण्यात आली आहे.
PM वय वंदना योजनेअंतर्गत जास्तीत जास्त मासिक पेन्शनची रक्कम 9250 रुपये आहे. तसेच 27,750 रुपये अर्धवार्षिक पेन्शन म्हणून घेऊ शकता आणि वार्षिक पेन्शन हवी असेल तर 1.11 लाख रुपये मिळतील. पण यासाठी PMVVS स्कीममध्ये 15 लाख रुपये जमा करावे लागतील. या योजनेची मुदत 10 वर्षे आहे. जर पती-पत्नी या योजनेत एकत्र गुंतवणूक करत असतील आणि गुंतवणुकीची रक्कम 30 लाख रुपये असेल, तर दरमहा 18,500 हजार रुपये पेन्शन म्हणून मिळतील.
60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेला कोणताही भारतीय नागरिक पीएम वय वंदना योजनेत गुंतवणूक करू शकतो. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी करावी लागणार नाही. दुसरीकडे, योजनेच्या मध्यभागी गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला संपूर्ण रक्कम परत मिळते. याशिवाय या योजनेत तीन वर्षांनी कर्ज घेण्याचीही सुविधा आहे.