मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) ची इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) 4 मे रोजी सुरू होणार आहे. ग्राहकांना 9 मे 2022 पर्यंत सदस्यत्वासाठी खुला असेल. हा मेगा IPO येत्या 2 मे रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होईल. या IPO ची किंमत 902-949 रुपये प्रति स्टॉक असू शकते. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन, IPO ची किंमत बँड कमी करण्यात आली आहे आणि ती 902-949 रुपये प्रति स्टॉक ठेवण्यात आली आहे.
प्रत्येक लॉटसाठी बिड लॉटचा आकार 15 असेल. एलआयसी आपल्या पॉलिसीधारकांना तब्बल 60 रुपयांची घसघशीत सूट देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर किरकोळ गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांना 40 रुपयांची सूट दिली जाईल.
पीटीआयच्या अहवालानुसार, एलआयसी आयपीओच्या माध्यमातून सरकार सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीतील 3.5 टक्के हिस्सा विकणार आहे. त्यामुळे सरकारला २१ हजार कोटी रुपये मिळतील. फेब्रुवारीमध्ये सरकारने एलआयसीमधील पाच टक्के स्टेक किंवा 316 कोटी शेअर्स विकण्याची योजना आखली होती. या संदर्भातील कागदपत्रे सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (सेबी) सादर करण्यात आली.
दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धामुळे बाजारातील अस्थिरतेचा परिणाम आयपीओच्या नियोजनावरही झाला. गेल्या आठवड्यात, सरकारने इश्यूचा आकार पाच टक्क्यांवरून 3.5 टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे.