मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी)ची प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) लवकरच खुला होणार असल्याने देशातील गुंतवणूकदार त्याची वाट पाहात आहेत. ही प्रतीक्षा आता अंतिम टप्प्यात आहे. मार्चच्या सुरुवातीला आयपीओ खुला होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेत (पीएमजेजेबीवाय) एलआयसीच्या विमाधारकांना आयपीओत सवलत मिळणार असल्याची माहिती एलआयसीचे अध्यक्ष एम. आर. कुमार यांनी दिली आहे. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना ही एलआयसीचाच भाग असल्यामुळे विमाधारकांना आयपीओमध्ये आरक्षण मिळेल, असे ते म्हणाले.
पीएमजेजेबीवायची सुरुवात २०१५ मध्ये झाली होती. त्याअंतर्गत १८ ते ५० वर्षांच्या सर्व बँक बचत खातेधारकांना दोन लाख रुपयांचा विमा दिला जातो. त्यासाठी ३३० रुपये प्रीमियमची वार्षिक रक्कम भरावी लागते. एलआयसीचा देशातील सर्वात मोठा आयपीओ आहे. याच माध्यमातून सरकारची ५ टक्के भागीदारी विकून ६३ हजार कोटी उभारण्याचा एलआयचीचा प्रस्ताव आहे. एम आर कुमार म्हणाले, की रशिया आणि युक्रेनदरम्यान निर्माण झालेल्या भू-राजकीय परिस्थितीवर एलआयसीचे लक्ष आहे. परंतु मार्च महिन्याच्या सुरुवातीला समभागविक्री करण्याचा गंभीरतेने विचार करत आहे. ज्या नागरिकांकडे बोली खुली झाल्याच्या तारखेपर्यंत एलआयसीची एक किंवा अधिक पॉलिसी आहेत, आणि जे भारताचे नागरिक आहेत, असे सर्व पॉलिसीधारक आरक्षणांतर्गत अर्ज करू शकतात. हे आरक्षण एकूण आकाराच्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक नसेल.