मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपल्या देशात शासन अंतर्गत शासकीय किंवा निमशासकीय अशा अनेक संस्था, कार्पोरेशन, मंडळे, महामंडळे आणि कंपन्या कार्यरत आहेत. यापैकीच एक महत्त्वाची संस्था म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी. एलआयसीचा आयपीओ लवकरच येणार आहे. या पार्श्वभूमीवर या संस्थेत एका मोठ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. विमा कंपनी LIC देशातील सर्वात मोठी इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) आणण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, LIC ने रिलायन्स निप्पॉनचे सुनील अग्रवाल यांची मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) म्हणून CFO म्हणून नियुक्ती केली आहे. एका वृत्तसंस्थेने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. एलआयसीने एवढ्या मोठ्या पदावर बाहेरच्या व्यक्तीची नियुक्ती करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, LIC आपला IPO लाँच करण्यापूर्वी बाजाराच्या मानकांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. हे लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे सुनील अग्रवाल हे यापूर्वी १२ वर्षांपेक्षा जास्त काळ रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्सचे सीएफओ होते. ते आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सशीही पाच वर्षे संबंधित होते. यापूर्वी, एलआयसीच्या कार्यकारी संचालक शुभांगी संजय सोमण सीएफओचा कार्यभार सांभाळत होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, LIC अग्रवाल यांच्या अनुभवाचा उपयोग गुंतवणूकदार आणि नवीन भागधारकांशी जोडण्यासाठी करेल. अग्रवाल यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली असून ते याच महिन्यात कंपनीत रुजू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सरकार इश्यूद्वारे LIC मधील 5% स्टेक विकत आहे. तथापि, अशीही बातमी आहे की सरकार पुढील 5 वर्षांत LIC मधील 25 टक्के भागभांडवल विकू शकते. सरकार याद्वारे 650 अब्ज रुपये उभारण्याची आशा करत आहे. मात्र, रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर जागतिक बाजारपेठांमध्ये सुरू असलेल्या गोंधळामुळे सरकार आयपीओची तारीख आणखी वाढवू शकते.