नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अदानी समुहामध्ये एलआयसी आणि एसबीआय यांनी केलेल्या गुंतवणुकीवरून बराच वाद निर्माण झाला होता. या मुद्द्यावर एलआयसीच्या प्रमुखांनी प्रकाश टाकत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी अदानीमधील गुंतवणूक धोकादायक नसल्याचे म्हटले आहे.
‘आम्हाला कोणत्याही एका कंपनीबद्दल बोलायचे नाही. परंतु, अदानींच्या कंपनीतील गुंतवणूकीतून एलआयसीला कोणतेही नुकसान झालेले नाही. आम्ही धोरण आणि प्रोटोकॉलनुसार अदानींच्या कंपनीत गुंतवणूक केली. जेव्हा कंपनीच्या शेअर्सची किंमत कमी होती तेव्हा आम्ही गुंतवणूक केली. जेव्हा किंमत वाढली तेव्हा आम्हाला त्याचा फायदा मिळाला. आम्ही आमच्या इंटरनल प्रोटोकॉल आणि रेग्युलेशन लक्षात घेऊन अदानींच्या कंपनीत गुंतवणूक केली. एलआयसी देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. त्यांचे १३ लाख विमा एजंट आहेत. अधिक विस्तारासाठी एजंट्सची संख्या वाढवण्याची गरज आहे,’ असे एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती म्हणाले.
पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचा होणार परिणाम
आम्ही पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाबद्दल उत्साहित आणि कृतज्ञ आहोत. गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत एलआयसीचे कौतुक केले तेव्हापासून गुंतवणूकदार, पॉलिसीधारक आणि भागधारकांप्रती आमची जबाबदारी आणि उत्तरदायित्व अधिक वाढले आहे. पंतप्रधानांच्या स्तुतीचा परिणाम कंपनीच्या भविष्यातील निकालांवरही दिसून येईल, असे मोहंती यांचे म्हणणे आहे.
एलआयसीवर मोदींना विश्वास
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी सध्या खूप चर्चा होत आहे. कधी संसदेत विरोधक त्यावर निशाणा साधतात तर कधी पंतप्रधान त्याचे कौतुक करतात. अविश्वास ठरावादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत एलआयसीचे कौतुक केले. एलआयसीची स्थिती किती मजबूत आहे याबद्दल त्यांनी भाष्य केले.
LIC