नाशिक – भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी)चे सर्व कर्मचारी व अधिकारी उद्या (१८ मार्च) एक दिवसीय संपावर जाणार आहेत. तशी माहिती विमा कर्मचारी संघटनेने दिली आहे.
विमा कर्मचारी संघटनेचे मोहन देशपांडे यांनी सांगितले की, आयपीओद्वारे एलआयसीचे सरकारी भांडवल विक्री करणे, भारतीय विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक ७४ % पर्यंत वाढवणे, एल आय सी कायद्यातील दुरूस्ती, सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण व कर्मचारी विरोधी कायदे ह्या केंद्रीय प्रस्तावांना विरोध म्हणून व ईतर मागण्यांसाठी विमा कर्मचारी – अधिकाऱ्यांनी १८ मार्च रोजी एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला आहे, असे देशपांडे म्हणाले.
संघटनेने म्हटले आहे की, जितक्या प्रमाणात सरकारी भांडवल विक्री तितक्या प्रमाणात खाजगीकरण होत असल्याने एल आय सी कडून अर्थव्यवस्थेला निधी पुरवठ्यात घट व विमेधारकांच्या बचतीला धोका होईल. भांडवल विक्री करीता एल आय सी कायद्यात बदल करावे लागतील ज्याचे दुष्परिणाम काही वर्षांनी जाणवतील. एल आय सी च्या नफ्यात व संपत्तीमध्ये खाजगी वाटेकरी वाढण्याने “लोकांचा पैसा लोकांच्या कल्याणासाठी” ह्या सुत्राची अंमलबजावणी भविष्यात अवघड होणार आहे. शिवाय विमेधारकांच्या बोनस मध्ये घट होईल, असे संघटनेने सांगितले आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेत गेल्या ६४ वर्षांपासून एल आय सी ची अत्यंत महत्त्वाची भागीदारी राहिली आहे. मात्र सरकार खाजगी – विदेशी विमा कंपन्यांना मजबूत करण्याचे निर्णय घेत आहे. विमा क्षेत्रात ७४% पर्यंत थेट परकीय गुंतवणूक वाढवणे हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
सदर संप प्रचंड यशस्वी होईल असा विश्वास काॅ जितेंद्र भाटीया, नरेंद्र नागराज क्लास १ ऑफीसर्स फेडरेशन, सुदाम म्हस्के, लक्ष्मीकांत मडकम नॅशनल फेडरेशन ऑफ फिल्ड वर्कर्स आॅफ इंडिया, अॅड कांतीलाल तातेड, मोहन देशपांडे विमा कर्मचारी संघटना नाशिक आदींनी व्यक्त केला आहे.