नवी दिल्ली – निर्गुंतवणुकीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सरकार लवकरच एलआयसी अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळाचा आयपीओ आणणार आहे. गेल्यावर्षी देखील याची घोषणा झाली होती, पण कोरोनामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली होती. अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी यांनी भारत सरकार निर्गुंतवणीकरण करत असणाऱ्या कंपन्यासंदर्भात माहिती दिली. त्यावेळी त्यांनी एलआयसीचा आयपीओ यंदाच्या वर्षी बाजारामध्ये येईल, असेही सांगितले आहे.
दोन बँका आणि एक आयुर्विमा कंपनीमधील निर्गुंतवणूक सरकारकडून केली जाणार आहे. एलआयसी आणि आयडीबीआयमधील निर्गुंतवणीकरण करुन ९० हजार कोटी रुपये उभे करण्याचे उद्देश सरकारने समोर ठेवल्याचे अर्थमंत्र्यांनी गेल्या वर्षी अर्थसंकल्पादरम्यान सांगितले होते. त्याचबरोबर इतर निर्गुंतवणूकीकरणाच्या माध्यमातून १.२ लाख कोटी सरकार उभे करणार असल्याचेही त्या म्हणाल्या होत्या.
एलआयसीचा आयपीओ म्हणजे काय?
एलआयसीचा आयपीओ म्हणजे सरकार आता शेअर बाजारमध्ये एलआयसीचा समावेश करणार आहे. कंपनीच्या आयपीओमुळे तिचे आर्थिक मूल्य लक्षात येईल. यानंतरही एलआयसीवर संपूर्णपणे सरकारचा अधिकार राहणार आहे.