मुंबई – मास्क लावल्यामुळे नीट बोलता येत नाही, फोनवर संभाषण करता येत नाही, श्वास घ्यायला त्रास होतो, शुद्ध हवेची खात्री नाही, यासारख्या असंख्य समस्यांवर एलजी कंपनी एक अत्याधुनिक मास्क लॉन्च करणार आहे. प्युरीकेअर फेस मास्क असे त्याचे नाव असून यातून श्वास घेताना संपूर्ण हवा शुद्ध होते, असा दावा कंपनीने केला आहे.
समोरच्यांशी बोलताना किंवा फोनवर बोलताना हा मास्क तोंडावरून खाली करण्याची आवश्यकता नाही, असाही दावा कंपनीने केला आहे. हा मास्क लावणारी प्रत्येक व्यक्ती व्हॉईस ऑन तंत्रज्ञानाने तयार केलेले मायक्रोफोन व स्पीकरने जास्त खुश होईल. चष्म्याच्या काचांवर धुकं येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, घाम येणे यासारख्या अडचणींवर मात करण्यासाठीच हा मास्क तयार करण्यात आला आहे, असे एलजीचे म्हणणे आहे. केवळ सुरक्षित नाही तर असुविधाही कमी करणारा मास्क असल्याचे ते म्हणतात.
विशेष म्हणजे हा मास्क तुम्ही दिवसभर लावून ठेवू शकता. केवळ ९४ ग्राम वजन असून १००० mAH बॅटरीमुळे तो सलग आठ तास आरामशीर काम करतो. त्यानंतर दोन तासात हा मास्क रिचार्जही होतो. मास्कमध्ये एक इनबिल्ट मायक्रोफोन आणि स्पीकर आहे. त्यामुळे मास्क खाली करून बोलण्याची आवश्यकता नाही आणि जोराने बोलण्याचीही गरज नाही. हा मास्क ऑगस्टमध्ये थायलंडमध्ये लॉन्च होईल. पण किमतीविषयी अद्याप कंपनीने धोरण जाहीर केलेले नाही.