पाटणा – उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ यांच्या एका निर्णयाबाबत बिहारमध्ये विरोध वेगाने वाढत आहे. चंपारण येथील भाजप नेते आणि लोकांमध्ये उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयावरून नाराजी पसरली आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर कालवा बांधून नदीच्या मुख्य प्रवाहाला बदलण्यास आमदार विनय बिहारी यांच्यासह बिहारचे पर्यटनमंत्री नारायण प्रसाद यांनी विरोध केला आहे. यावरून त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि बिहारचे जलसंधारण मंत्री संजय झा, विभागाचे प्रधान सचिव यांना पत्र लिहून कालव्याच्या बांधकाम रोखण्याची मागणी केली आहे. या मुद्दयावरून राजीनामा देण्याचा इशाराही विनय बिहारी यांनी दिला आहे.
नदीचा प्रवाह बदलण्यास विरोध
पर्यंटनमंत्री प्रसाद यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले, उत्तर प्रदेशच्या एका एजन्सीद्वारे कालव्याचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या नद्यांचा मुख्य प्रवाह बदलून बिहारच्या गंडक नदीमध्ये जाणार आहे. चंपारणच्या किनारी भागात पुराचा धोका वाढून त्याचा परिणाम योगापट्टी, बेरिया, नौतन या भागांवर होणार आहे. बेतिया जिल्ह्यातही पुरामुळे विद्ध्वंस होण्याची शक्यता आहे. बेतियाचे विभागीय अधिकारी म्हणाले, कालव्याच्या बांधकामाला रोखल्यानंतर रात्री काम केले जात आहे. यामुळे जनतेमध्ये मोठा आक्रोश आहे. जर याबाबत निर्णय घेण्यात आलेला नसेल तर त्याचा आढावा घेण्यात यावा.
बिहार-यूपीच्या सीमेवरील लोक चिंतीत
कालव्यामुळे बिहारमधील पश्चिम चंपारण (बेतिया) जिल्ह्यातील अनेक गावांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यूपीमधील अनेक गावांमध्ये दरवर्षी पुरामुळे मोठा विद्ध्वंस होतो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आता यूपी सरकारकडून तयार करण्यात येणा-या कालव्यामुळे बिहारमधील गावांमध्येसुद्धा पुराचा धोका वाढणार आहे. योगापट्टी भागातील अनेक गावांचे नुकसान होण्याची शक्यता आमदार विनय बिहारी यांनी व्यक्त केली आहे.
भाजप नेत्यांची वाढली धाकधूक
चंपारणमध्ये सध्या भाजपचा बोलबाला आहे. पर्यटनमंत्री नारायण प्रसाद हे भाजपचेच आहेत. बिहार सरकारमधील उपमुख्यमंत्री रेणू देवी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जायस्वाल हेसुद्धा चंपारण भागातून निवडून गेले आहेत. या कालव्याचा सर्वाधिक परिणाम भाजपचे आमदार विनय बिहारी यांच्या विधानसभा मतदारसंघातच होणार असल्याने लोकांचा आक्रोश वाढला आहे. त्यामुळे भाजपचे नेते चिंतातूर झाले आहेत.