नाशिक : पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची बदली न्यायालयाने स्थगित केल्यानंतर सोमवारी सायंकाळी इंडिया दर्पणने तो आमदार कोण हा प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. त्यावर लाखो प्रतिक्रिया उमटल्या. आता बदलीसाठी पत्र देणारा हा आमदार विदर्भचा असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे विदर्भातील प्रश्न मांडायचे सोडून राज्याच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या नाशिक जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांविरोधात या आमदाराने सूरु केलेल्या मोहीमे मागचे गुपित काय ? याबद्दल नाशिकमध्ये चर्चा होत आहे.
या गोष्टीसाठी सुरुवातीला ना ना म्हणत असणाऱ्या या आमदार महोदयांना पटवले गेले अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यामागे असे कोणते हितसंबंध होते याचा शोध आता घेतला जात आहे. तूर्तास मुंबई उच्च न्यायालयाने सदर बदलीस स्थिगिती दिली असून ठोस कारण न देता वरिष्ठ अधिकाऱ्याची एका आमदाराच्या तक्रारीवरून कार्यकाळ पूर्ण न होऊ देता बदलीचा निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारला फटकारले आहे.
दरम्यान एका विदर्भाच्या आमदाराला पाठबळ देणारे व संबंध नसताना त्यांना अ-राजकीय दृष्ट्या पाठबळ देणारे जिल्ह्यातील आमदार कोण ही चर्चा देखील आता झडू लागली आहे. हा आमदार विधान परिषद सदस्य असल्याचेही बोलले जात आहे. एकुणच या बदलीमागे काय गौडबंगाल आहे हे हळूहळू समोर येईल. पण, नाशिक जिल्ह्याशी फारसा संबध नसलेल्या या आमदाराने या बदलीसाठी पत्र देणे ही गोष्ट जिल्ह्यातील आमदारांना सुध्दा धक्का देणारीच आहे.
दर्यासागर कोण
या बदलीमागे एका दर्यासागराचा फूस असल्याचेही समोर आले आहे. हा जिल्ह्यातील कोणत्या लोकप्रतिनिधी सोबत मंत्रालयात राजरोस फिरून व्हाईटकॉलरपणा दाखवतो याचा शोध घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. एकूणच ‘धवळ्याच्या शेजारी बांधला पवळ्या,वाण नाही पण गुण लागला अशी ग्रामीण भागात म्हण आहे त्याअनुषंगाने शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे की नाशिक जिल्ह्यातील हा पवळ्या कोण ? याचा शोध घेणे गरजेचे आहे.