नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – साकोरे मिग येथील एचएएलच्या कंपाऊंड वॉलमध्ये असलेल्या भगदाडात तारेच्या कुंपणामध्ये अडकलेल्या बिबट्याला वनविभागाने बेशुध्द करुन सुरक्षितरित्या बाहेर काढले. त्यानंतर बिबट्याला वनविभागाने पिंज-यामध्ये ताब्यात घेतले. सात ते आठ महिने वय असलेला हा बिबट्या या वॅालकंपाऊच्या तारेत अडकला होता. ही घटना वनविभागाला मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहचले घटनास्थळावर परिस्थितीची पाहणी करून पशुधन विकास अधिकारी ओझर डॉ. तोरण पवार यांचा वैद्यकीय सल्ला घेण्यात आला. त्यानंतर वरीष्ठ अधिका-यांशी चर्चा करुन त्यांच्या मार्गदर्शनानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी यशस्वीरीत्या डार्ट करून बिबट्याला बेशुद्ध केले. त्यानंतर त्याला सुरक्षित रित्या पिंजऱ्यामध्ये वनविभागाच्या ताब्यात घेण्यात आले. या रेस्कु मोहिमेत इको इको नाशिकचे अभिजित महाले व इतर सदस्य, एचएएलचे अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य केले.