नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक – औरंगाबाद राज्य मार्गावर निफाड तालुक्यातील चितेगाव फाटा जवळ हॉटेल डोंगराईजवळ गुरुवारी रात्री ९.३० वाजता अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमी झालेला हा बिबट्या बेशुध्द झाला. पण, त्यानंतर त्याला शुध्द येताच त्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कर्मचारी जखमी झाला आहे. त्यानंतर जखमी बिबट्या द्राक्ष बागेत पळून गेला. नाशिक – औरंगाबाद राज्य मार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झाला होता. धडक बसल्यानंतर तो महामार्गावरच बेशुध्द पडला. त्यानंतर बेशुध्द बिबट्याला बघण्यासाठी रस्त्यावरील वाहने थांबली. त्यानंतर त्यांनी बिबट्या मोबाईल मध्ये कैद करण्यासाठी गर्दी केली. त्यानंतर काही वेळातच वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी व काही नागरिकांनी जखमी बिबट्याच्या अंगावर पाणी टाकले. त्यानंतर बिबट्या शुध्दीवर आला व त्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या पोटरीला त्याने चावा घेतला. त्यानंतर या बिबट्याने द्राक्ष बागेत धूम ठोकली.