अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अहमदनगर जिल्ह्यामध्ये या वर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे ऊस शेतीमध्ये सर्वत्र पाणी साचल्यामुळे बिबट व इतर वन्यप्राणी भक्ष्याच्या शोधामध्ये मोकळ्या जागेवर अथवा मनुष्य वस्तीवर येण्याच्या घटना वाढत आहेत. शेतीमध्ये काम करत असताना बिबटसोबत संघर्ष होण्याच्या घटना घडू शकतात. बिबटसोबतचा संघर्ष टाळण्यासाठी वनविभागामार्फत सातत्याने जनजागृती करण्यात येत असुन याबाबतची माहिती उपवनसरंक्षक कार्यालयातसुद्धा उपलब्ध आहे.
मागील काही दिवसांपासून बिबटांचे मनुष्यावरील हल्ले व पशुधन जखमींची संख्या वाढलेली आहे.अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहुरी, कोपरगाव, राहाता, श्रीरामुपर, नेवासा य श्रीगोंदा या तालुक्यामध्ये ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असून बिबट वन्यप्राण्यांची संख्या देखील या तालुक्यामध्ये जास्त आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांनी बिबटप्रवण क्षेत्रात शेतीची कामे करताना मानव बिबट संघर्ष टाळण्यासाठी खालील सुचना उपयुक्त ठरणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
घुंगरांची काठी
सद्यस्थितीमध्ये शेतीची कामे सुरू असताना मंजुरानी व संबंधित शेतक-यांनी आपल्या लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवावेत, अनेकदा त्यांना शेतीची कामे करत असताना खेळायला मोकळे सोडले जाते. लहान मुलांची उंची व बिबट्याची उंची सारख्या प्रमाणत येत असल्याने बिबट्या भक्ष्य समजून त्यांच्यावर हल्ला करण्याची शक्यता असते. ज्या ठिकाणी मुलांना ठेवले जाते तिथे हातात घुंगराची काठी घेऊन मोठया व्यक्तीस थांबवावे, जेणेकरुन बिबटया दिसल्यास मुलांची सुरक्षा करता येते. खुप वाकुन शेतीची कामे करु नये, अशावेळी दुसराच एखादा चार पायाचा प्राणी आहे असे समजुन बिबटयाचा पाठमोरा हल्ला होऊ शकतो.
गाणी वाजवा
शेतीची कामे सुरु असतांना ट्रॅक्टर मधील टेपरेकॉर्डरवर किंवा चांगल्या वायरलेस ब्ल्यूटुथ स्पीकरचा वापर करुन मोठया आवाजात गाणी सुरु ठेवावीत. यामुळे बिबटया जवळ येण्याची शक्यता कमी होते. शेतीचे कामे करत असताना समुहाने कामे करावी. एकट्या व्यक्तीने शेतीची कामे करु नये, गावाजवळ, जंगलात, शेतात अथवा गावठाण हद्दीत बिबट दिसल्यास बघण्यास गर्दी करू नये अथवा दगड मारून पळवून लावण्याचा प्रयत्न करू नये अथवा मोबाईलने फोटो काढण्याचा प्रयत्न करू नये. शक्यतो शेतीची कामे करताना मानेभोवती हातरूमाल किंवा मफलर चा वापर करावा.
बिबट्याची पिल्ले सापडल्यास
अनेकदा शेतीची कामे असताना शेतात बिबटयांची किंवा रान मांजराची पिल्ले सापडतात. रानमांजर व बिबटयाची पिल्ले आढळल्यास या पिलांच्या जवळ न जाता शेतातील कामे थांबवावी व जवळच्या वनविभाग कार्यालयास माहिती दयावी. ही पिल्ले हातात उचलून घेऊ नये किंवा ती पाहण्यासाठी गर्दी करु नये. पिलांची आई आसपासच दबा धरुन बसलेली असु शकते, अशा वेळी ती तिच्या पिल्लांच्या रक्षणासाठी मानसावर हल्ला करु शकते. पिलांना न हाताळता पिल्ले जागेवरच राहु दयावीत. मादी तिचे पिल्ले पुन्हा सुरक्षित स्थळी हलवते यावेळी तिचा सामना झाल्यास तिच्याजवळ जावु नये किंवा तिला हुसकुन लावण्याचा प्रयत्न करु नये. शेतात बिबटयाची पिल्ले सापडल्यास त्यांना हाताळु नये, किंवा त्यांच्या सोबत फोटो काढू नयेत. त्यांना त्रास होईल असे कोणतेही वर्तन करु नये, असे करणे वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कायदयाने गुन्हा आहे. बिबट किंवा बिबट्याची पिल्ले आढळल्यास तात्काळ वनविभागास कळविणे आवश्यक आहे.
ऊसाच्या शेतीत
अलिकडच्या काळात वाढत्या ऊस क्षेत्रामुळे मानव व बिबटया हे सहजिवनच बनलेले आहे. बिबटया बाबत अधिक माहिती हवी असल्यास नजिकच्या वनपरिक्षेत्र कार्यालयास संपर्क साधुन किंवा जाणकार व्यक्तीकडुन माहिती घ्यावी. मानव बिबट संघर्ष टाळण्यासाठी सुचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहनही उपवनसंरक्षक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
Leopard Human Conflict Farming Instructions