नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेट्रोल-डिझेलच्या गगनाला भिडलेल्या दरामुळे सामान्य माणूस आधीच होरपळत असताना आता महागाईने आगीत तेल ओतले आहे. तप्त उष्णेतेच्या झळांपासून दिलासा मिळवण्यासाठी सामान्य माणूस लिंबू पाणीसुद्धा पिऊ शकत नाही अशीच परिस्थिती आहे. वाढत्या उष्णतेमुळे लिंबांची मागणी वाढल्याने अनेक ठिकाणी लिंबाचे भाव ३०० रुपये किलोच्या वर गेले आहेत. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे लिंबाची रोपे उद्ध्वस्त झाली होती. परिणामी लिंबाचे उत्पादनही कमी झाले आहे, अशी माहिती एका भाजी व्यापाऱ्याने दिली.
देशभरात लिंबाचे भाव गगनाला भिडले आहेत. अनेक ठिकाणी भाजी मंडईत दहा रुपयाला एक लिंबू मिळत आहे. नाशिकच्या भाजी मंडईत दहा रुपयांत दोन लिंबू, तर वीस रुपयांत लहान चार लिंबू मिळत आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत लिंबाचे भाव ३०० ते ३५० रुपये किलो, तर राजधानी दिल्ली आणि नोएडामध्ये लिंबाचे भाव २५० ते ३०० रुपये एवढे झाले आहेत. गेल्या आठवड्यात लिंबू २०० रुपये किलो विक्री होत होते, आता भाव २५० रुपये किलोच्याही वर गेले आहेत, असे काही भाजीविक्रेत्यांनी सांगितले.
दिल्लीत लिंबाचे भाव ३५०-४०० रुपये प्रति किलो आहेत. नोएडामध्ये ८० ते १०० रुपयांमध्ये पाव किलो लिंबू मिळत आहेत. गाजीपूर भाजी मंडईत २५० रुपये किलोप्रमाणे विक्री करत आहेत. भाजी मंडईत दोन प्रकारचे लिंबू मिळत आहेत. साधे लिंबू ३०० रुपये, तर पिवळे लिंबू ३६० रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहेत.
कुठे किती भाव
दिल्ली – ३०० ते ४०० रुपये किलो
मुंबई – ३०० ते ३५० रुपये किलो
भोपाळ – ३०० ते ४०० रुपये किलो
जयपूर – ३५० ते ४०० रुपये किलो
लखनऊ – २५० रुपये किलो
रायपूर – २०० ते २५० रुपये किलो
https://twitter.com/ANI/status/1512292215241920519?s=20&t=z02J_hah1ebx2DN8Y9qNQw