मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत हा सुंदर पुष्पगुच्छाप्रमाणे विविधतेने नटलेला देश आहे. प्रत्येक राज्याची वेशभूषा, भाषा इत्यादी बाबतीत स्वतंत्र ओळख असली तरीही सर्व भारतीयांना जोडणारे राष्ट्रीय चारित्र्य समान आहे. देशातील राष्ट्रीयतेचा भाव वृद्धिंगत करण्यासाठी प्रत्येकाने आपली सांस्कृतिक ओळख जपताना स्थानिक संस्कृतीशी एकरुप झाले पाहिजे, तसेच महाराष्ट्रात असताना मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले.
गुजराती सांस्कृतिक फोरम या मुंबईतील सामाजिक सांस्कृतिक संस्थेच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 11 प्रसिद्ध गुजराती व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सन्मानित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी प्रसिद्ध अभिनेते दिलीप जोशी, जन्मभूमि समूहाचे मुख्य संपादक कुंदन व्यास, नेत्र चिकित्सक डॉ कुलीन कोठारी, प्रसिद्ध नाट्यलेखक प्रवीण सोळंकी, कवी, लेखक अंकित त्रिवेदी, उद्योजक विनेश मेहता, कमला मेहता, अंधशाळेच्या अध्यक्षा हंसाबेन मेहता, नेहरू तारांगणचे माजी संचालक डॉ जे जे रावल, प्रशासकीय अधिकारी खुश्वी गांधी, उद्योगपती अशोक मेहता व समाजसेवक विपुल मेहता यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रात आल्यावर आपण स्वतः 5-6 महिन्यात चांगली मराठी शिकलो. आपण राज्यातील प्रत्येक विद्यापीठांमधील दीक्षांत समारंभाचे संचलन तसेच चेंबर ऑफ कॉमर्स आदी व्यापार विषयक संस्थांमध्ये देखील संचलन मराठी भाषेतून किंवा शक्य नसल्यास हिंदीतून करावे असे आग्रहाने सांगत असतो, असे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी माजी राज्यमंत्री राज पुरोहित, गुजराती सांस्कृतिक फोरमचे संस्थापक गोपाल पारेख, अध्यक्ष विजय पारेख, सचिव जयेश पारेख,सहसचिव धर्मेश मेहता आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
ऐतिहासिक ठिकाणी सन्मान झाल्याचा आनंद : दिलीप जोशी
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतून जेठालालचे पात्र साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांनी ऐतिहासिक अशा राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते सन्मान होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आपला जन्म मुंबईत झाला व आपण महाराष्ट्रात जन्मलो याचा अभिमान वाटतो, असे त्यांनी सांगितले. आज आपण 57 वर्षांचे आहोत, परंतु इतक्या वर्षांनी प्रथमच राजभवनात यावयास मिळाले, याबद्दल दिलीप जोशी यांनी आनंद व्यक्त केला.
Learn Marathi Governor Koshyari Advise to Gujrati Peoples