इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालनाः ओबीसी आरक्षणासाठी लढा उभारणारे नेते प्रा. लक्ष्मण हाके महायुतीच्या बाजूने भूमिका घेत थेट मैदानात उतरले आहेत. “ज्या ठिकाणी आमचे उमेदवार आहेत, ‘वंचित’चे उमेदवार आहेत तेथे ओबीसी मतदारांनी त्यांना मतदान करावे. ज्या ठिकाणी आमचे उमेदवार नाहीत, त्या ठिकाणी दगडापेक्षा वीट या युक्तीप्रमाणे महायुतीला ओबीसींनी मतदान करावे”, असे त्यांनी म्हटले आहे.
प्रा. हाके म्हणाले, “ज्या आमदारांनी मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचे लेखी पत्र दिले, त्यांना ओबीसी भटक्या विमुक्त जातींमधील मतदारांना पाठिंबा देऊ नये. त्या आमदारांनी मागील पाच वर्षात काय केले. याचा जाब विचारावा.” महायुती सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले. मोदी सरकारने घटनादुरुस्ती करून ‘ईडब्ल्यूएस’मध्ये दहा टक्के आरक्षण दिले; परंतु हे दोन्ही आरक्षण मनोज जरांगे यांना मान्य नाही. मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण हवे, अशी जरांगे यांची मागणी आहे. त्यामुळे गावाकडे ओबीसी आणि मराठा, असा द्वेष निर्माण झाला आहे. हा द्वेष निवडणुकीत दिसून येत आहे, असे त्यांनी सांगितले.
जरांगे हे शरद पवार यांनी दिलेल्या स्क्रिप्टनुसार काम करत आहेत. त्यामुळे २८८ मतदारसंघांपैकी केवळ ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघात जाऊन जरांगे यांनी सभा घेतली, असा आरोप करून प्रा. हाके म्हणाले, की विधानसभेत ओबीसीची बाजू मांडण्यासाठी या निवडणुकीत किमान २० ते २५ ओबीसी आमदार आम्ही निवडून देणार आहोत. ज्या ठिकाणी आमचे उमेदवार आहेत, त्या ठिकाणी ओबीसी समाज आपली ताकद मतदानाच्या रूपात दाखवणार आहे.