मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण (वय ८९) यांचे आज निधन झाले. त्यांना यावर्षीच पद्म पुरस्काराने स्मानित करण्यात आले होते. तब्बल ६ दशके त्यांनी लावणी चाहत्यांच्या मनावर राज्य गाजविले. त्यांच्या निधनाने कलासृष्टीची अपरमित हानी झाली आहे. विविध क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
मुंबईतील गिरगावमधील फणसवाडी येथे आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. सोळावं वरीस धोक्याचं, उसाला लागलं कोल्हा, पाडाला पिकलाय आंबा, पावणा पुण्याचा आलाय गं, अशा शेकडो लावण्या त्यांनी अजरामर केल्या. लावणी आणि सुलोचना ताईंचे वेगळेच नाते होते. मराठी चित्रपटसृष्टीत ठसकेबाज लावणी गात त्यांनी एक वेगळीच भूरळ श्रोत्यांना घातली होती. फक्त चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सुलोचना दीदीनी भोजपुरी, हिंदी, गुजराती, तामीळ, पंजाबी आदी भाषांतील गीते गायिली. त्यांच्या या कामाबद्दल त्यांना ‘लावणीसम्राज्ञी’ हा किताब प्राप्त झाला. त्यांनी केवळ लावण्याचं नाही, तर भावगीते आणि भक्तिगीतेदेखील गाऊन लोकसंगीताचं दालन देखील समृद्ध केलं.
सुलोचना चव्हाण यांनी स्वत:ला समाजकार्यातही झोकून दिले होते. कार्यक्रमातून मिळणाऱ्या मानधनातील मोठा हिस्सा धार्मिक संस्थांना तसेच गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. भारत सरकारने त्यांना सांस्कृतिक क्षेत्रातील भरीव योगदानासाठी ‘पद्मश्री’ या नागरी पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या निधनाने कलाविश्वाचं मोठं नुकसान झालं असून संगीत क्षेत्रातला बुलंद आवाज हरपला आहे. मी व माझे कुटुंबीय चव्हाण कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे छगन भुजबळ यांनी शोक संदेशात शेवटी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
“मराठी लोककलेचं लावण्य असणाऱ्या लावणीला घराघरात आणि मनामनात पोहचविणाऱ्या लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या लावणीची ओळख सांगणारा आवाज शांत झाला आहे”,अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. श्रीमती चव्हाण यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्राची मोठी हानी झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे. दरम्यान, श्रीमती चव्हाण यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याबाबतही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, “ महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्रासाठी ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांचा आवाज एक मोठा ठेवा आहे. त्यांना आवाजाचे वरदानच मिळाले होते. या आवाजाची ताकद ओळखून त्यांनी आपल्या प्रतिभेने आणि कलासाधनेतून अनेक गाणी अजरामर केली. मराठी लोककलेचं वैशिष्ट्य असणाऱ्या लावणीमध्ये तर त्यांनी श्वासच फुंकला. लावणीची नजाकत त्यांनी आपल्या सुरांनी जिवंत केली. त्यामुळंच तमाशा फडातील ही लावणी घऱाघरात आणि मनामनापर्यंत पोहचली. पार्श्वगायनासह, लावणीचे विविध प्रकार त्यांनी खुलवून सादर करत रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून उमेदीच्या काळात विविध कारणांसाठी निधी उभारणीकरिता जाहीर कार्यक्रम केल्याची उदाहरणे आजही दिली जातात. अशा लोककलेशी आणि समाजाशी एकरूप, सहृदय महान कलावंताचे निधन हे महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्राची हानी आहे. ज्येष्ठ गायिका, लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
#पद्मपुरस्कार वितरण :
ज्येष्ठ लोकगीत गायिका #सुलोचनाचव्हाण यांना कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी राष्ट्रपती श्री #रामनाथकोविंद यांच्या हस्ते आज #पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.#PadmaAwards2022 pic.twitter.com/TcPUeQ5TUh
— महाराष्ट्र परिचय केंद्र (@MahaGovtMic) March 28, 2022
Lavani Queen Sulochana Chavhan Passed Away