नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकेकाळी लावणी नर्तकांचा महाराष्ट्रात जलवा होता. पण हळूहळू दर्जेदार लावणी करणाऱ्या कलावंतांची संख्या कमी झाली आणि त्यामुळे इतर प्रकारांना प्रोत्साहन मिळू लागले. यात नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा आज महाराष्ट्रात सर्वत्र जलवा आहे.
गौतमी पाटील खरंतर अश्लील हावभाव देणारी नृत्यांगणा म्हणून महाराष्ट्राला परिचित होती. पण अनेक स्तरांवरून यावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर तिने सर्वांची माफी मागितली आणि अश्लील हावभाव देणं बंद केलं. तरीही तिचा जलवा कायम राहिला आणि कार्यक्रमांची संख्याही वाढत आहे. गौतमी मुळची खानदेशातील असली तरीही तिचे सर्वाधिक कार्यक्रम पुणे आणि कोल्हापूरमध्ये झाले आहेत. त्यातही बहुतांश कार्यक्रम ग्रामीण भागात होतात. तिची क्रेझ ग्रामीण भागामध्ये जास्त असल्याचं दिसून येतं.
तिचे ठुमके, अदा आणि बहारदार डान्स सर्वांनाच मोहित करतो. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात तिच्या कार्यक्रमांना गर्दी करतात. विशेष म्हणजे आयोजक कितीही खर्च करून गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करायला तयार असतात. तिच्या तारखा मिळविण्यासाठी कसरत करावी लागते. कार्यक्रम घ्यायचा असेल तर दोन महिने आधी तरी तारीख निश्चित करावी लागते. कारण वेळेवर आयोजन करताना गौतमीच्या तारखाच मिळणं अवघड आहे.
नट्यांपेक्षा जास्त कमाई
गौतमी पाटील एका कार्यक्रमाचे दोन लाख रुपये घेते. त्यात तिच्या सहकलावंतांचं मानधन सोडलं तरी लाखाहून अधिक कमाई तिचीच असते. असे महिनाभर कार्यक्रम सुरू असतात. तर कधीकधी एकाच दिवशी दोन कार्यक्रमही असतात. मुख्य म्हणजे काही आयोजक दुप्पट मानधन द्यायला तयार असतात. त्यामुळे महिन्याला ३५ ते ४० लाख रुपये ती एकटीच कमावते. एखाद्या मराठी नटीपेक्षा जास्त कमाई गौतमी करीत असल्याचे लक्षात येते.
व्हिडिओमुळे खळबळ
काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडियो एकाने व्हायरल केला होता. कार्यक्रम संपल्यावर गौतमी स्टेजच्या मागे कपडे बदलत होती. त्यावेळी एकाने लपून व्हिडियो काढला आणि तो सोशल मिडियावर व्हायरल केला. या व्हिडियोने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती.
Lavani Dancer Gautami Patil Program Fees