नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिद्द आणि मेहनतीच्या बळावर मोठे यश मिळवता येते, हे लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील मदिया खदीर सय्यद हिने सिद्ध केले आहे. जुलै २०२५ मधील अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा (ITI) मध्ये देशात द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल, आज दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित कौशल्य दीक्षांत समारोहात लातूरच्या मदियाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला.
बांधकाम मजूर असलेल्या वडिलांच्या कष्टावर आणि आईच्या प्रोत्साहनावर उभी राहिलेल्या मदियाचे हे यश संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. या समारंभात बोलताना पंतप्रधान मोदींनी कौशल्य विकासाचे महत्व विशद केले. तसेच, त्यांनी ‘पीएम-सेतू’ (PM-SETU) योजनेचा शुभारंभ केला, ज्यामुळे देशभरातील १,००० हून अधिक ITI संस्थांचे आधुनिकीकरण केले जाईल. PM मोदी म्हणाले की, PM-SETU योजना भारतीय तरुणांना जागतिक कौशल्य मागणीशी जोडेल. ITI संस्था या आत्मनिर्भर भारताच्या कार्यशाळा आहेत, असे त्यांनी यावेळी नमूद केले.