.
लातूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रिक्षावाले काका आणि विद्यार्थ्यांचे अनोखे नाते निर्माण होत असते. आता रिक्षा ऐवजी स्कूल बस किंवा व्हॅन मधून विद्यार्थ्यांची ने -आण करण्याचे प्रमाण वाढले आहे. साहजिकच या वाहन चालक आणि मुलांचे एक वेगळीवेगळी गट्टी जमते. ज्याप्रमाणे वाहनचालक मुलांची काळजी घेतात त्याचप्रमाणे मुले सुद्धा या काका लोकांची काळजी घेतात, दोघेही घटक एकमेकाची कशी काळजी घेतात, हे लातूरमधील एका घटनेवरून दिसून आले. शहरात धावत्या स्कूलबसच्या चालकाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याने प्रसंगावधान दाखवत २५ मुलांचे प्राण वाचवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत हृदयविकाराच्या झटक्यामुळे चालकाचा मृत्यू झाला. मात्र त्यापूर्वी त्यांनी बसमधील विद्यार्थ्यांना काही होणार नाही याची काळजी घेत त्यांच्या प्राणांचे रक्षण केले.
वेदना वाढत गेल्या….
लातूर शहरातील श्री श्री रविशंकर शाळेची विद्यार्थी वाहतूक करणारी बस दुपारची शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी निघाली. बस चालक महावीर भोपलकर हे गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांना शाळेतून घरी सोडण्याचे काम करतात. शालेय विद्यार्थी आणि वाहन चालक भोपलकर काका यांची चांगलीच मैत्री जमली आहे. परंतु अचानकपणे धावत्या बसमध्ये त्यांना हृदयामध्ये तीव्र वेदना होऊ लागल्या. मात्र प्रसंगावधान राखत त्यांनी बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि बसमधील विद्यार्थी सुरक्षित असल्याची खात्री केली. अचानक महावीर काकांना कशाचा तरी त्रास होतो याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली आणि गाडीतील विद्यार्थ्यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. मात्र वेदना वाढत गेल्या आणि त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला.
विद्यार्थ्यांची खात्री केली
वाहन चालकांना देखील हृदयविकाराचा झटका धावत्या वाहनांमध्ये येऊ शकतो. भोपलकर यांना देखील वाहन चालवताना याची जाणीव झाली असावी. त्यामुळे त्यांनी तात्काळ त्यांनी गाडी बाजूला घेतली आणि वाहन बंद करून सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत का? याची खात्री केली. विद्यार्थ्यांनी मदतीसाठी केलेली आरडाओरड पाहून तेथे आलेल्या लोकांनी चालक महावीर यांना कृत्रिम श्वासोश्वास देण्याचा प्रयत्नही केला. बसमधील एक विद्यार्थी धावत जाऊन जवळच असलेल्या हॉस्पिटलमधील डॉक्टरला घेऊन आला. नागरिकांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चालक भोपलकर यांना तात्काळ लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तिथे त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेने लातूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच वाहन चालकांनी नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.