लातूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती करून या देशात समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे समतेच राज्य टिकविण्यासाठी या संविधानाचे रक्षण करणे तुमची आमची सर्वांचीच जबाबदारी आहे. या संविधानाला जर कुणी हात लावत असेल, अन्याय करत असेल तर त्या अन्यायांविरोधात लढा उभारण्यासाठी भीम सैनिक सदैव तयार असायला हवा, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.भरपावसात त्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती लातूर यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या संविधान स्तंभाचे लोकार्पण राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पुज्य भंते थेरो पञ्चानंद,खासदार सुधाकर श्रृंगारे,माजी राज्यमंत्री आ.संजय बनसोडे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आ.बाबासाहेब पाटील,माजी खासदार सुनिल गायकवाड,बापू भुजबळ, मकरंद सावे, प्रशांत पाटील, लाला सुरवसे, वाजीद मणियार, डी. उमाकांत,अँड गोपाल बुरबुरे आणि कार्यक्रमाचे आयोजक नवनाथ आल्टे,सूरज सुरवसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, सम्राट अशोकाने या स्तंभाजी निर्मिती केली. भगवान गौतम बुद्धांचे विचार या स्तंभात आहे. आपल्याकडे असलेल्या शक्तीचा उपयोग हा समाजाच्या भल्यासाठी करण्यात यावा. यासाठी त्यांनी सिंहाचे मुखवटे यात लावले आहे. हे संयमाचे आणि शांततेचे प्रतीक आहे. हे प्रतीक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधनावर छापले आहे. या संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. जर कुणी त्याला हात लावत असेल तर त्याच्याविरुद्ध आवाज उठविला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा अशी शिकवण दिली. त्यानुसार बहुजन समाजाने शिक्षण घेतलं पाहिजे. समाज हितासाठी काम केलं पाहिजे. ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या ठिकाणी आवाज उठवायला हवा. भगवान गौतम बुद्ध, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले या समाज सुधारकांनी शिक्षण घेऊन समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यासाठी घटनेची निर्मिती केली. मात्र आजही समाजातील काही वर्ग अंधश्रद्धा पाळतो आहे ही गंभीर बाब आहे असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, देशात पुन्हा मनुवाद पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जातीवाद धर्मवाद निर्माण केला जात आहे. त्याविरुद्ध आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भीम सैनिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकता संघर्ष करू शकतात त्यांच्यातच ती ताकद आहे असेही ते म्हणाले.
ते म्हणाले की, या देशात अन्यायांविरुद्ध जो आवाज उठवेल त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. समतेचे चक्र उलटे फिरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संविधानातील स्तंभातील सिंहाचे पंजे म्हणजेच भीमसैनिकांचे पंजे त्यावर हल्ला करून त्याला फाडून काढतील असे सांगत सर्व समाजाने एकोपा ठेवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
Latur NCP Leader Chhagan Bhujbal Speech In Rain