इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लातूर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहे. महानगरपालिका आयुक्तांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं हे अद्याप समोर आलेले नाही.
ही घटना घडल्यानंतर पोलिसांची टीम त्यांच्या बंगल्यावर पोहचली. बाबासाहेब मनोहरे यांनी ज्या पिस्तूलाने आत्महत्येचा प्रयत्न केला ती पिस्तुल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी काडतुसेदेखील ताब्यात घेतली आहे. शनिवारी रात्रीचे जेवण झाल्यानंतर ते आपल्या खोलीत गेले होते. काही वेळाने त्यांच्या खोलातून गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यानंतर सर्वांनीच खोलीकडे धाव घेतल्यानंतर मनोहरे हे रक्ताच्या थोरळयात दिसले. त्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान मनोहरे यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. पहाटे त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांच्या डोक्यात गोळी लागून बाहेर निघालेली आहे. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले.