लातूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निद्रावस्थेत असलेल्या दोन मुलींच्या अंगावर हिटरचे गरम पाणी पडल्याची हृदयद्रावक घटना लातुर येथे घडली आहे. मजुरी करणाऱ्या मुलींसोबत घडलेल्या या घटनेनंतर शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
लातूरच्या कव्हा येथील नामदेव शेळके यांच्या घरात हिटरचे गरम पाणी अंगावर पडल्याने ११ वर्षीय मुलगी माहेश्वरी आणि १३ वर्षीय योगेश्वरी या दोन मुली जखमी झाल्या आहेत. दोघेही ५० ते ६० टक्के भाजल्या आहेत. दोन्ही चिमुकल्या मुली झोपेत असताना हिटरमधील गरम पाणी पडले. त्यामुळे दोघीही भाजल्या. त्यानंतर जखमी मुलींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तर, या घटनेमुळे शेळके कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
नामदेव शेळके यांच्या दोन्ही मुलींच्या अंगावर हिटरचे पाणी पडल्याने त्या भाजल्या आहेत. मात्र, रुग्णालयात उपचारासाठी पैसे लागत असल्याने शेळके यांच्या मदतीला गावकरी धावून आले आहेत. कव्हा येथील गावकऱ्यांनी तसेच दिशा फाऊंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे. कव्हा ग्रामस्थांनी पैसे जमा करुन शेळके यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, सोशल मीडियामध्येही काही जणांनी पोस्ट करुन मदतीचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत काहींनी रुग्णालयात जाऊन मुलांच्या आई-वडिलांना मदतीचे आश्वासन दिले आहे. तर अनेकांनी थेट आर्थिक मदत देखील केली आहे.
गावकऱ्यांनी दिला मदतीचा हात
शेळके कुटुंबातील मुलींसोबत घडलेल्या या घटनेनंतर त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. शेळके कुटुंबाच आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांना शक्य ती मदत ग्रामस्थ करणार आहेत.