लातूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शासकीय योजनांसाठी येणाऱ्या निधीत आर्थिक भ्रष्टाचार करण्याचे प्रकार सर्वत्र आढळत असताना लातूर जिल्ह्यातील बेंडगा गावातील सरपंचांनी स्वत:च्या पतीच्या पेन्शनमधून सुकन्या आणि कन्यादान योजना राबविताहेत. इतरांसाठी आदर्श घालून देणाऱ्या या महिला संरपंचाचे नाव मोहरबाई तात्याराव धुमाळ असे आहे.
मोहरबाई धुमाळ यांचे पती दिवंगत तात्याराव धुमाळ हे मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्याच्या निधनानंतर मोहरबाई यांना पेन्शन मिळते. एक मुलगा आहे तो घराची सहा एकर बागायत शेती पाहतो. सतराशे लोकसंख्या असलेल्या बेंडगा या गावाच्या सरपंच मोहरबाई तात्याराव धुमाळ यांनी पदभार घेतल्यापासून धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यात कन्यादान आणि सुकन्या योजनेचा समावेश आहे. यासाठी कोणत्याही शासकीय निधीसाठी त्या अवलंबून राहिल्या नाहीत. या दोन्ही योजनांसाठी पुढील पाच वर्षांपर्यंत लागणारा निधी त्यांनी स्वतः दिला आहे.
कोणत्याची अर्जाची गरज नाही
सरपंचपदी निवडून आल्यानंतर गावाच्या विकासासाठी जे काही करता येईल ते करावे अशी इच्छा होती. त्याची सुरुवात स्वतःपासून करावी यासाठी आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात या दोन योजना स्वत:च्या खर्चातून सुरू कराव्या असे वाटले. पहिल्याच ग्रामसभेत तशी घोषणा केली, १ जानेवारी २०२३ पासून योजना लागू केली. यासाठी कोणताही अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असे मोहरबाई धुमाळ म्हणाल्या.
दोघींना मिळाला लाभ
सरपंचपदी नुकतंच विराजमान झालेल्या मोहरबाई तात्याराव धुमाळ यांनी ही योजना १ जानेवारीपासून अमलात आणली आहे. याचा लाभ गावात जन्म घेतलेल्या दोन मुलींना झाला आहे. संपूर्ण गावच एक घर आहे या विचाराने आम्ही काम करतोय, पुढील पाच वर्षे असेच काम सुरू राहणार आहे, सात सदस्य आणि एक सरपंच असे आठ लोक गावाचा कारभार कुटुंबप्रमुखाच्या रुपात पाहणार आहेत.
Latur Bendgyachya Sarpanch Moharbai Dhumal