मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नव्वदच्या दशकानंतर देशाच्या राजकारणात झालेल्या बदलामुळे संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेच्या जागांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीनंतर भाजप १०० जागांसह सर्वोच्च शिखरावर पोहोचला आहे. तर ३३ खासदारांसह काँग्रेस नीचांकी संख्येवर आली आहे.
आगामी राज्यसभा निवडणूक काँग्रेससाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. परंतु ज्या पद्धतीने काँग्रेसचा राज्यांमध्ये पराभव होत आहे, ते पाहता काही वर्षांनंतर पक्षासमोर राज्यसभेतही प्रमुख विरोधी पक्ष होण्याचा दर्जा गमावण्याचा कठीण प्रसंग येण्याची शक्यता आहे.
नव्वदच्या दशकाच्या अखेर मंडलच्या राजकारणाने देशाची दशा आणि दिशा बदलली होती. एकीकडे भाजपचा आलेख वाढण्यास, तर दुसरीकडे काँग्रेसचा आलेख घसरण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर तीन दशकात भाजपने काही धक्के सोसून आपला आलेख चढाच कायम ठेवला आहे. तर काँग्रेसच्या समस्या आणखी वाढल्या आहेत. विशेषतः २०१४ मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेसला विविध राज्यांमध्ये आपले सरकार कायम ठेवण्यास कठीण जात आहे. सध्या दोन राज्यातच काँग्रेसचे सरकार राहिले आहे.
संसदेच्या विशेषतः राज्यसभेच्या आकड्यांच्या गणितात खूप मोठे अंतर आले आहे. १९९० मध्ये काँग्रेसचे १०८ राज्यसभा खासदार होते. आता ते घटून ३३ झाले आहेत. तर भाजप ५५ वरून १०० वर पोहोचला आहे. राज्यसभेत प्रमुख विरोधी पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी किमान २५ खासदार असणे आवश्यक आहे. परंतु राज्यांमध्ये एकामागून एक सत्ता गमावल्यानंतर लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही काँग्रेसच्या खासदाराची संख्या घटली आहे. परिणामी प्रमुख विरोधी पक्षाचा दर्जा गमावण्याची नामुष्की काँग्रेसवर येण्याची शक्यता आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने प्रमुख विरोधीपक्षाचा दर्जा गमावला आहे. जुलैमध्ये होणाऱ्या राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीत काँग्रेसची परिस्थिती समाधानकारक राहण्याची शक्यता आहे.
जुलैमध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपचे आमदार घटल्यानंतरही राज्यसभेत त्यांचे जास्त खासदार होतील. काँग्रेस आणि बसपा हे दोन्ही पक्ष कमकुवत होण्याचा भाजपला फायदा होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये ११ खासदारांचा कार्यकाल समाप्त होणार आहे. त्यामध्ये भाजपच्या पाच खासदारांचा समावेश आहे.
सध्याच्या विधानसभेत भाजपची संख्या पाहता त्यांचे सात खासदार निवडून येणे निश्चित मानले जात आहे. फोडाफोडी करून ते आठवा खासदारही निवडून आणू शकतात. दुसरीकडे राज्यात मुख्य विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीच्या झोळीत तीन जागा जातील. सपाच्या तीन खासदारांचा कार्यकाळ समाप्त होणार आहे. त्यामुळे त्यांचा न फायदा, न तोटा होणार आहे.