नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विमानासारख्या अत्याधुनिक वाहनाच्या बाबतीत तर अत्यंत किरकोळ बिघाड देखील प्रवाशांच्या जीवाला धोकादायक ठरू शकतो, कारण विमान हे आकाशात अधांतरी उडत असते. त्यामुळे हा धोका अधिक असतो. गेल्या २४ दिवसात तब्बल ९ वेळा स्पाईसजेट कंपनीचे विमान खराब झाले आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
महिनाभरापूर्वी दिल्ली विमानतळावर एक धोकादायक दुर्घटना टळली. दिल्लीहून जम्मूला जाणाऱ्या प्रवाशांनी भरलेले स्पाईसजेटचे विमान उड्डाणाच्या आधी विजेच्या खांबाला धडकले. त्यामुळे विमान आणि खांबाचे दोन्ही नुकसान झाले. त्यानंतर आता दुबईहून मदुराईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या बोईंग B737 MAX विमानाचे चाक निकामी झाल्याने उशीर झाला. ही घटना सोमवारी दि. ११ रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. स्पाइसजेटच्या विमानात 24 दिवसांत तांत्रिक बिघाड होण्याची ही नववी घटना आहे. या घटनेनंतर विमान कंपनीचे धाबे दणाणले आहेत.
मात्र, याप्रकरणी कंपनीकडून स्पष्टीकरणही समोर आले आहे. बोईंग B737 MAX विमानाने सोमवारी मंगळुरु-दुबई फ्लाइट चालवली. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले की, विमान उतरल्यानंतर एका अभियंत्याने तपासणी केली आणि समोरचे चाक नेहमीपेक्षा जास्त संकुचित झाल्याचे आढळले.
एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, अभियंत्यांनी विमान थांबवण्याचा निर्णय घेतला आणि स्पाईसजेटने दुबई-मदुराई रिटर्न फ्लाइट चालवण्यासाठी मुंबईहून दुबईला दुसरे विमान पाठवले. विमान कंपनीने नंतर स्पष्टीकरण दिले की, शेवटच्या क्षणी तांत्रिक समस्येमुळे फ्लाइटला उशीर झाला.
स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने पीटीआयला सांगितले की, दि. 11 जुलै 2022 रोजी दुबईहून मदुराईला जाणारे स्पाइसजेट फ्लाइट एसजी 23 शेवटच्या क्षणी तांत्रिक समस्येमुळे उशीर झाले. प्रवाशांना भारतात परत आणण्यासाठी तत्काळ पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली. कोणत्याही विमान कंपनीने अशी कोणतीही घटना घडलेली नाही ज्यामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येईल.
स्पाईसजेटच्या विमानात तांत्रिक बिघाडांच्या वारंवार घडणाऱ्या घटनांनंतर 19 जूनपासून त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. याआधी 2 जुलै रोजी जबलपूरला जाणारे स्पाइसजेटचे विमान सुमारे 5,000 फूट उंचीवर क्रू मेंबर्सच्या केबिनमध्ये धूर पाहून दिल्लीला परतले होते.
Last 24 days 9 times Spicejet Aircraft Malfunction