कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सौ. सुवर्णा जगताप यांनी दिली माहिती
लासलगांव – येथील बाजार समितीच्या लासलगांव मुख्य बाजार आवारावर सोमवार, २ ऑगष्ट, २०२१ पासून टोमॅटो लिलावास सुरूवात होणार असल्याची माहिती बाजार समितीच्या सभापती सौ. सुवर्णा जगताप यांनी दिली. लासलगांवसह परीसरातील निफाड, चांदवड, नांदगांव, येवला, सिन्नर, कोपरगांव तालुक्यातील गावांमध्ये शेतक-यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटो ह्या शेतीमालाची लागवड केलेली असल्याने त्यांना मालविक्रीची सोय व्हावी म्हणून बाजार समितीतर्फे गेल्या २४ ते २५ वर्षापासून लासलगांव मुख्य बाजार आवारावर टोमॅटो लिलावास सुरूवात करण्यात आलेली आहे.
त्यानुसार ह्यावर्षी सोमवार, २ ऑगष्ट, २०२१ पासून प. पू. भगरीबाबा धान्य व भाजीपाला मुख्य बाजार आवार लासलगांव येथे टोमॅटो लिलाव सुरू होणार आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादकांनी आपला टोमॅटो हा शेतीमाल मोठा (सुपर / एक नंबर), मध्यम, लहान (गोल्टी), बदला (बिलबिला, तडकलेला, खरचटलेला) अशी योग्य प्रतवारी करून २० किलोच्या क्रेटस् मध्ये विक्रीस आणावा. लिलावानंतर लगेचच इलेक्ट्रॉनिक काट्यावर चोख वजनमाप करून रोख चुकवती देण्यात येईल. तसेच टोमॅटो खरेदीस इच्छुक असणा-या नविन व्यापा-यांनी लायसेन्सबाबतच्या सर्व अटी, शर्तींची पुर्तता केल्यास त्यांना तात्काळ परवाना देऊन प्रतवारी व पॅकींगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सौ. जगताप यांनी सांगितले.
तरी शेतकरी बांधवांनी त्यांचा टोमॅटो हा शेतीमाल सोमवार २ ऑगष्ट पासून प. पू. भगरीबाबा धान्य व भाजीपाला मुख्य बाजार आवार लासलगांव येथे विक्रीस आणावा असे आवाहन बाजार समितीच्या सभापती सौ. सुवर्णा जगताप, उपसभापती सौ. प्रिती बोरगुडे, सचिव नरेंद्र वाढवणे व सर्व सदस्य मंडळाने केले आहे.