लासलगाव – लासलगाव जवळ असलेल्या टाकळी विंचुर येथील विठ्ठल रूखमाई मंदिरात २९ जुलै रोजी अल्पवयीन मुलीच्या विवाह प्रकरणात बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्या फिर्यादीनुसार वरासह पुरोहित, वधुवरांचे चार नातेवाईक अशा सहा जणांविरोधात लासलगाव येथील पोलिस स्थानकात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक अशी की, २९ जुलै रोजी हा विवाह झाला होता. अल्पवयीन मुलीचा बालविवाहास प्रतिबंधक कायदा असताना हा विवाह झाल्यामुळे त्याची चर्चा झाली. टाकळीचे ग्रामविकास अधिकारी व बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी शशीकांत माधव कदम यांनी या विवाहाची फिर्यादी दिली. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. यात पुरोहित, विजय भास्कर मौले, शोभा विजय मौले, वर विशाल प्रकाश जाधव, श्रीमती भारती प्रकाश जाधव सर्व रा., लासलगाव व संदीप दत्तु कदम रा. टाकळी विंचुर यांना आरोपी करण्यात आले आहे. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे क ९ , १० , ११ प्रमाणे हा गुन्हा दाखल झाला आहे. लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार ठोबरे व तपासी अंमलदार पो. ना. एस. शिंदे पुढील तपास करीत आहेत.